याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक अभंग यांच्यासह अंकुश ढवळे, किरण बोराडे, प्रताप देवकाते, भरत इंगवले, रवि जाधव यांचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत करत सदर संशयितांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार हे तरूण स्थानिकच आहेत. त्यांच्या चौकशीत ते मुलाला केवळ गंमत म्हणून घाबरवत असल्याचे पुढे आलं आहे. मात्र, त्यांनी तसे केल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. शिवाय त्यांच्या वाहनाबद्दल पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
यासंबंधी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील निरीक्षक रामराम ढिकले यांनी सांगितलं की, यातील दोघेही आरोपींनी मद्यापान केले होते. त्यांनी रस्त्यात सुरुवातील तीन व्यक्तींना लिफ्ट दिली. त्या बदल्यात त्यांच्याकडून प्रत्येकी दहा रुपये घेतले. ते उतरल्यानंतर पुढे तीन शाळकरी मुले भेटली. त्यांनाही गाडीत घेतले. त्यांच्याकडेही दोघांनी पैसे मागितले. मुलांकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी दोघांना उतरविले व एकाला गाडीतच ठेवले. गाडीतील मुलाने आरडाओरड केली. त्यामुळे बाजूचे लोक धावत आले. मुलाला पळून नेण्याचा प्रयत्न असल्याच्या संशयावरून त्यांनी सुरुवातीला जाब विचारला. उद्धट उत्तरे मिळाल्याने माराहाण सुरू झाली. जमाव वाढत गेला. आरोपींच्या गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी होती. पूर्वी ही गाडी एखाद्या अधिकाऱ्याकडे असावी. टोल वाचविण्यासाठी त्यांनी ती तशीच ठेवली असावी. या प्रकरणी पोलिसांना दोन गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र शासनाची पाटी वापरून फसवणूक केल्याबद्दल त्या दोघा तरुणांविरुद्ध तसंच मारहाण, तोडफोड केल्याबद्दल ग्रामस्थांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हरिभाऊ दत्तु वाळुंज (वय २७ वर्ष, रा. पिंपळगाव तुर्क, ता. पारनेर) आणि नासीर गुलाब पठाण (वय २८ वर्ष, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जिल्हा- अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.