चंद्रपूर : जिल्ह्यात आज विजेच्या तांडवामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्याच्या शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील पाटण, चिखली येथे दोन महिलांचा मृत्यू झाला तर मारई पाटण येथील एका व्यक्तीने प्राण गमावले आहेत. वंदना चंदू कोटनाके, भारुला अनिल कोरांगे आणि चंद्रकांत टोपे अशी मृतांची नावे आहेत. तसंच वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत अन्य तीन महिला जखमीही झाल्या आहेत.
जिवती तालुक्यातील दुसऱ्या घटनेत एका शेतकऱ्याचा वीज पडून मुत्यू झाला आहे. चंद्रकांत ठुमके असं मृतकाचे नाव आहे. मारईपाटण येथील शेतकरी चंद्रकांत ठुमके हे शेतात काम करत होते. याचदरम्यान चंद्रकांत यांच्यावर वीज कोसळली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना गडचांदूर येथील आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, जिल्ह्यात एकाच दिवशी तीन जणांनी जीव गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.