थिरुअनंतपुरम : पहिल्या सामन्यात भारताने जिंकत मालिका विजयाचे आज घट बसवल्याचे पाहायला मिळाले. गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेला भारतापुढे १०७ धावांचे आव्हान ठेवता आले होते. खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असल्यामुळे भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव तळपला आणि त्याने भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. राहुल आणि सुर्या यांनी यावेळी आपली नाबाद अर्धशतकेही झळकावली व संघाला आठ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा यावेळी शून्यावर बाद झाला, त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर फलंदजीला आलेल्या विराट कोहलीलाही फक्त तीन धावा करता आल्या. त्यावेळी भारताची २ बाद १७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे समीकरणच बदलून टाकले. सूर्यकुमारने सुरुवातीपासूनच आफ्रिकेच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करायला सुरुवात केली. त्यामुळेच भारताच्या संघावरचे दडपण यावेळी हलके झाले आणि त्याना विजय मिळवता आला.

तत्पूर्वी, चहरने पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला आणि पहिल्या सलामीवीराला तंबूत धाडले. पण त्यानंतर दुसऱ्या षटकात तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची संपूर्ण हवाच निघून गेली. कारण दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डीकॉकला बाद केले आणि भारताला दुसरे यश मिळवून दिले. अर्शदीप फक्त या एका विकेटवर थांबला नाही. या षटकात अजून दोन विकेट्स त्याने मिळवले. अर्शदीपने दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिली सोरोवला बाद केले. अर्शदीप यावर फक्त थांबला नाही. त्याने या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ८ अशी दयनीय अवस्था केली. अर्शदीपने सलग दोन विकेट्स काढल्या, त्यामुळे पुढच्या षटकातच्या पहिल्या चेंडूवर त्याला ह्रट्रीक मिळवण्याची संधी होती. पण भारतीय संघ फक्त या एकाच गोष्टीवर थांबला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातही भारतीय संघाला यश मिळाले.

यावेळी तिसरे षटक हे पुन्हा टाकण्यासाठी दीपक चहर आला. दीपकने या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्रिस्टन स्टब्लला बाद केले आणि आफ्रिकेला यावेळी पाचवा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ यावेळी गारद झाला आणि त्यांना फक्त ९ धावा करता आल्या होत्या त्यानंतर एडन मार्करम आणि वेन पार्नेल यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केशव महाराजने ४१ धावांची खेळी साकारल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला शतकाची वेस ओलांडता आली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला यावेळी भारतापुढे १०७ धावांचे आव्हान ठेवता आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here