आमच्या भगव्या झेंड्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो असेल, अशी माहिती शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यानं दिली. दोन भगव्या झेंड्यांमुळे लोकांचा गोंधळ उडू नये यासाठी आम्ही झेंड्यावर बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो वापरणार आहोत. त्या झेंड्याचं डिझाईन फायनल झालं आहे, असं या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.
दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटानंही जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘काही दिवसांपूर्वी गोरेगावातील नेस्को मैदानात गटप्रमुखांचा मेळावा झाला. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे दसरा मेळाव्यातही राऊत यांच्या नावाची खुर्ची रिकामी ठेवण्यात येऊ शकते,’ असं ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यानं सांगितलं. संजय राऊत पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात अटकेत आहेत. ईडीनं अटक केल्यानंतर त्यांचा मुक्काम तुरुंगात आहे.
संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबातील सगळ्या सदस्यांना धीर दिला. संजय राऊत यांच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे आहोत, असा संदेश ठाकरेंनी दिला आहे. त्यामुळेच नेस्को मैदानातील सभेवेळी राऊत यांचं नाव असलेली खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. ठाकरेंच्या या कृतीची बरीच चर्चा झाली होती.