नवी दिल्ली : अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षात मोठा गदारोळ सुरू आहे. अध्यक्षपदासाठी राजस्थानचं मुख्यमंत्रिपद सोडण्यास अशोक गेहलोत यांनी नकार दिल्याने काँग्रेस नेतृत्वासमोर मोठा पेच निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अशोक गेहलोत यांना भेटीसाठी बोलावत त्यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर माध्यमांसमोर येऊन गेहलोत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकजुटीचा आणि सर्वधर्मसमभावाचा विचार मांडत आहे. या यात्रेदरम्यान मी त्यांना भेटून अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची विनंती केली. मात्र राहुल गांधी हे त्यांच्या विचारावर ठाम होते. त्यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर देशभरातील कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन मी ही निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून ज्या घटना घडल्या त्यानंतर मी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी घोषणा अशोक गेहलोत यांनी केली आहे.

दरम्यान, अशोक गेहलोत यांच्या माघारीनंतर आता काँग्रेसमध्ये शशी थरूर आणि दिग्विजय सिंह या दोन नेत्यांमध्ये अध्यक्षपदासाठी सामना होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray: शिरुरमध्ये काही लोकं ‘ढळली’, पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत: उद्धव ठाकरे

गांधी कुटुंबाचा कल कोणाकडे?

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुख्य उमेदवार कोण यावरून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे दिग्विजय सिंह रिंगणात उतरले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी कुटुंबाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असली तरी त्यांचा कल कोणत्या उमेदवाराकडे आहे हे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे. दिग्विजय सिंह यांना गांधी कुटुंबाचा पाठिंबा आहे काय, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे गांधी कुटुंबाची संमती लाभलेला उमेदवार होण्यासाठी मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, कुमारी सेलजा, मीराकुमार, के. सी. वेणुगोपाळ आदी इच्छुक प्रतीक्षेत आहेत.

Chandrakant Khaire : खैरेंचा गौप्यस्फोट, ‘… तेव्हा एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते’

शशी थरूर यांनी यापूर्वीच आपली उमेदवारी जाहीर केली असून उमेदवारी अर्जाच्या पाच प्रतीही घेतल्या आहेत. मात्र, दिग्विजय सिंह यांनी खरोखरीच उमेदवारी अर्ज दाखल केला तर तेच मुख्य उमेदवार ठरतील आणि त्या परिस्थितीत गांधी कुटुंबाचे प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या नेत्यांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. गांधी कुटुंबाचे निकटस्थ ए. के. अॅण्टनी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास नकार दिला आहे, तर राहुल गांधी यांनी ऑफर देऊनही आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. अशा स्थितीत गांधी कुटुंबाचे समर्थन कोणाला मिळते यावर या निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल. तूर्तास दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांची उमेदवारी निश्चित वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here