शिरुर मतदारसंघातील शिवसैनिकांनी गुरुवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’च्या आवारात या सर्व शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आढळराव पाटलांवर कडाडून हल्लाबोल केला. शिरुर मतदारसंघातील काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत कायम आहेत. नाव एक आणि करायचं दुसरंच, असा हा प्रकार झाला. शिरुर मतदारसंघात शिवनेरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या नावाला बट्टा लागणे हा शिवसेनेचा अपमान आहे. त्यामुळे यापुढे शिरुरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये, असं आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले.
उद्धव ठाकरे यांच्या तिखट प्रतिक्रियेनंतर आढळराव पाटील यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं. मी पक्षाबरोबर गेली १८ वर्ष अढळच राहिलो. अनेक संकटं आली, अनेक वादळं आली, खूप संघर्ष करावा लागला. परंतु त्या ही परिस्थितीत शिवसेनेबरोबर, बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिलो. गेली १८ वर्ष उद्धवजींना साथ दिली. पण १८ वर्षांच्या निष्ठेचं फळ म्हणून कुणाचं तरी ऐकून, कुणाच्या तरी कानी लागून उद्धवजींनी माझी हकालपट्टी केली. हा सगळा प्रकार मला आवडला नाही, महाराष्ट्रालाही हा सगळा प्रकार आवडला नाही, असं आढळराव पाटील म्हणाले.
…म्हणून उद्धव ठाकरेंना रामराम ठोकला
“मी पक्षाशी गद्दारी केली नाही, शिवसेनेने माझ्याशी गद्दारी केली नाही. मला गद्दार म्हणायचा कुणाचाही संबंध नाही. काहीही कारण नसताना पक्षाने माझी हकालपट्टी केली. त्यानंतर दोन तासांनी मला फोन करुन सांगतात मी चुकलो, माफ करा..शिरुरमध्ये आपल्याला पुन्हा कामाला लागायचंय.. असा निरोप त्यांनी मला धाडला. झालं गेलं विसरुन आम्ही पुन्हा कामाला लागलो. पण त्यांना रिपोर्टिंग करणारे लोक चुकीचे आहेत. त्यामुळेच पक्षाचं नुकसान झालंय. माझी हकालपट्टी झाल्याने माझे कार्यकर्ते-पदाधिकारी आणि स्वत: मी देखील दुखावलो गेलो तसेच हिंदुत्वापासून दूर गेलेल्या उद्धव ठाकरेंपासून आपण फारकत घ्यावी, असा निर्णय झाला अन् मी त्यांना रामराम ठोकला”, असं आढळराव पाटील यांनी सांगितलं.
पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठीच सगळं केलं. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे लुप्त पावलेले विचार शिंदेंनी जागृत केले. बाळासाहेबांचे विचार पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचं काम एकनाथ शिंदे करतायेत. मी उद्धवजींवर बोलण्याइतपत मोठा नाहीये, पण मला त्यांना एवढंच सांगायचचंय, त्यांच्या स्मृतीत असेल की नसेल माहिती नाहीये, त्यांनी तथाकथित गैरसमजातून माझी हकालपट्टी केली. पेपरमधध्ये बातमी आल्यानंतर त्यांनी मला २-३ फोन केले,माझं चुकलं, असं मला फोनवर म्हणाले. हकालपट्टी मागे घेतो, असं ते मला फोनवर म्हणाले. पण नंतर काय झालं हे महाराष्ट्राला माहिती आहे.”