दसऱ्याच्या दिवशी सप्तशृंगी गडावर महिषासुराच्या रुपात बोकडाचा बळी दिला जातो अशी परंपरा आहे. मात्र २०१६ ला मंदिर आवारात बोकड बळी देण्याच्या वेळी बंदुकीच्या छऱ्यांने बारा जण जखमी झाले होते. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून मंदिरात बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली होती. सुरुवातीला भाविकांनी या निर्णयावर मोठा विरोध दर्शवला होता, मात्र नंतर भाविकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करत ही प्रथा पूर्णपणे बंद केली होती.
तसेच सप्तश्रृंग गडावर वर्षभरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्यात नवरात्रोत्सवात गर्दीची लाटच उसळत असते. दसऱ्याच्या दिवशी महिषासुराच्या रुपात बोकडाचा बळी दिला जातो अशी परंपरा आहे. त्यामुळे या ही परंपरा पूर्ण करण्यासठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. त्यामुळे मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चेंगरा-चेंगरी होत होती. यादृष्टीने देखील बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली होती.
५ वर्षांपासून बंद होती बळीची प्रथा
गेल्या ५ वर्षापासून बोकड बळीची प्रथा बंद होती, मात्र धोडांबे येथील आदिवासी विकास सोसायटीच्या वतीने बोकड बळीची प्रथा पुन्हा सुरु व्हावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी होत, उच्च न्यायालयाने अटी-शर्थीसह ही प्रथा पुन्हा सुरु करण्यात परवानगी दिली आहे.त्यामुळे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर ही प्रथा पूर्ण जल्लोषात पार पडली जाणार आहे.या निर्णयामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर नवस आणि विविध कारणातून बोकड बळी देनाऱ्या भाविकांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे.