यंदा शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरेंचा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांचा असे दोन स्वतंत्र दसरा मेळावे होणार आहेत. दोन्ही गटांनी आपापला मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. एकनाथ शिंदे गटाकडूनही काही तासांपूर्वीच त्यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर लाँच करण्यात आला होता. टीझरमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील आवाजाचा वापर करत शिवसैनिकांना भावनिक साद घालण्यात आली होती. ‘शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा आणि हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सतत आसमंतात फडकत राहिला पाहिजे,’ या बाळासाहेबांनी केलेल्या आवाहनाची आठवण टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना करून देण्यात आली आहे.
दसऱ्याला मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची भीती
मूळ शिवसेना कोणाची हा वाद न्यायप्रविष्ठ असतानाच मुंबईत ऐतिहासिक दसरा मेळावा साजरा होणार आहे. या मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शनासाठी दोन्ही गटांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने तीन हजार, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १,४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत. यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात खासगी बस मालकांची दिवाळी साजरी होणार आहे. मुंबईत दसऱ्याच्या दिवशी, बुधवारी दुपारपर्यंत या गाड्या पोहोचतील, असे नियोजन आहे. ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ठिकाणांवरील गाड्या मंगळवारी रात्री मुंबईच्या दिशेने रवाना होतील. मुंबई महानगर प्रदेशातील वाहने बुधवारी सकाळी नियोजित सभास्थळासाठी रवाना होतील. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
अजित पवार पहिले कोणाचं भाषण ऐकणार?
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळाव्याचे भाषणही जवळपास एकाचवेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्की कोणाचे भाषण ऐकायचे, असा पेच निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना तुम्ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाचे भाषण पहिले ऐकाल?, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आणि शिंदे या दोघांची भाषणं एकाचवेळी सुरु झाली तर मी प्रथम उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकेन. त्यानंतर टीव्हीवर रिपीट करण्यात येणारे एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकेन, असे अजित पवार यांनी सांगितले.