मुंबई : पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांच्या हाती आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून संजय राठोड यांची धाकधूक वाढवली. ज्यांच्यासाठी सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंवर दडपण टाकलं त्यांच्याविरोधातच महाराज आता पुढची लढाई लढतील. “लढवय्या समाज माझ्यासोबत आहे. लढाई लढताना-संघर्ष करताना सोबत आलेल्या मावळ्यांचं महत्त्व अधिक असतं”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महंत सुनील महाराज यांचं महत्त्व अधोरेखित केरताना शिवसेना पक्षात त्यांचं स्वागत केलं तसेच पोहरादेवीला भेट देण्याचं सुनील महाराज यांचं निमंत्रणही स्वीकारलं.

“बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे पंचमीच्या यात्रेच्या शुभदिनी मी आज शिवसेनेत प्रवेश करतोय. उद्धव ठाकरे यांनी मला शिवबंधन बांधलंय. बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिवसेनाच काम करु शकते, असा माझा दृढविश्वास आहे. ज्यांच्यासोबत आम्ही होतो, त्यांनी वेगळा मार्ग निवडला. पण सारासार विचार करुन मी शिवसेनेचा भगवा हाती घ्यायचा निर्णय घेतला. माझ्यासोबत शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करतायेत. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करु”, असा निर्धार सुनील महाराज यांनी बोलून दाखवला.

संजय राठोड यांना हद्दपार करणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सुनील महाराज म्हणाले, “आज शिवसेनेत प्रवेश केलाय. ठाकरेंनी हातात शिवबंधन बांधलंय. त्यांना आम्ही पोहरादेवीला येण्याचं आमंत्रण दिलंय. लवकरच मोठा दौरा आयोजित करु. ‘शिवसेवा’ संकल्प दौऱ्याच्या निमित्ताने लोकांशी संवाद साधू. त्यांच्याशी चर्चा करु पण निवडणूक लढवण्यासंबंधी अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. पण आमचा समाज उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल, असं सांगत राठोडांविरोधात सुनील महाराजांनी रणशिंग फुकलं.

सुनील महाराज कोण आहेत?

  • सुनील महाराज हे पोहरादेवी गडाच्या पाच ते सहा प्रमुख महंतांपैकी ते एक
  • संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजात मोठं स्थान
  • याआधीही अनेक वेळा राजकीय विधानांमुळे चर्चेत
  • संजय राठोड यांच्यासाठी ठाकरेंना भिडलेले
  • पण आता राजकीय स्पेस ओळखून ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय

Shivsena: बंजारा समाजाचे महंत सुनील महाराजांचा शिवसेनेत प्रवेश, संजय राठोडांसाठी धोक्याची घंटा?
सुनील महाराजांनी ‘स्पेस’ ओळखली, ठाकरेंनी राठोडांना अडकविण्यासाठी जाळं टाकलं

सुनील महाराज हे राजकीय महत्वाकांक्षी आहेत, ते या आधीही अनेक राजकीय व्यासपीठावर दिसून आले आहेत. त्यांना वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात किंवा कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. या आधी त्यांनी स्वतःला बंजारा नेता म्हणून राज्यसभेवर किंवा राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर घेण्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी केली होती. सध्या वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी शिंदे गटात गेल्या आहेत, तर कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी हे भाजपचे आहेत, त्यामुळे त्यांना शिवसेना पक्ष सोयीचा वाटतो, तर संजय राठोड यांच्या सारखा मोठा बंजारा नेता उद्धव ठाकरेंना सोडून गेल्याने बंजारा वोट बँक पुन्हा मजबूत करण्यासाठी शिवसेनेकडून सुनील महाराजांना बळ दिलं जातंय.

लढवय्या समाज माझ्यासोबत, शिवसेना १० पावलं पुढं

“बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. पण काही लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. ते न आवडल्यानेच आज सुनील महाराज शिवसेनेत आले आहेत. लढवय्या समाज माझ्यासोबत आहे. लढाई लढताना-संघर्ष करताना सोबत आलेल्या मावळ्यांचं महत्त्व अधिक असतं”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महंत सुनील महाराज यांचं महत्त्व अधोरेखित केलं. तर लवकरच मी पोहरादेवीला जाऊन देवीचं दर्शन घेईल. राठोडांना शह वगैरे देण्याचा प्रश्न नाही. शिवसेनेचं काय होणार? असा ज्यांना ज्यांना प्रश्न असेल त्याचं उत्तर हे आहे की शिवसेना १० पावलं पुढे आहे. मी शह द्यायच्या भानगडीत पडत नाही. मला पुढे जायचंय, पण लवकरच महाराष्ट्र दौरा करुन पुढचं प्लॅनिंग सांगतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here