पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांच्या हाती आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून संजय राठोड यांची धाकधूक वाढवली. बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे पंचमीच्या यात्रेच्या शुभदिनी सुनील महाराज यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्वव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याबद्दल विचारलं असता, त्यांनी उपहासात्मकपणे शिंदेंच्या मेळाव्याची खिल्ली उडवली.
शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा होतो तो म्हणजे शिवाजी पार्कवर.. शिवसेना ही एकच आहे. त्यामुळे कोण कुठे काय करतं… असे दसरा मेळावे होतच असतात. पंकजाताई पण दसरा मेळावा घेतात. त्यामुळे शिवसेनाचा मेळावा एकच शिवाजी पार्कवर… असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर पत्रकारांनी एकनाथ शिंदे विचारांचे वारसदार म्हणवतात, असं विचारलं असता ‘दुर्दैव..’ अशा एका शब्दात ठाकरेंनी शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा निकाल लावला.
ठाकरेंचा दसरा मेळावा
शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची वातावरणनिर्मिती करण्यासाठी पहिला टिझर लाँच करण्यात आली आहे. काहीवेळापूर्वीच सोशल मीडियावर सेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर शेअर करण्यात आला. यामध्ये पूर्वीच्या काळात दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर झालेली गर्दी, उद्धव ठाकरे पाहायला मिळत आहेत. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील ‘माझ्या तमाम हिंदू मराठी बंधू आणि भगिनींनो’ ही ट्रेडमार्क लाईनही टिझरमध्ये ऐकायला मिळत आहे. तसेच शिंदे गटाप्रमाणे शिवसेनेनेही एक नेता, एक झेंडा, एक मैदान… ही टॅगलाईन वापरली आहे. शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, असे आवाहन टिझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना करण्यात आले आहे.
शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीजर लॉन्च
शिंदे गटाकडून रिलीज करण्यात आलेल्या पहिल्या टीझरमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील आवाजाचा वापर करत शिवसैनिकांना भावनिक साद घालण्यात आली आहे. ‘शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा आणि हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सतत आसमंतात फडकत राहिला पाहिजे,’ या बाळासाहेबांनी केलेल्या आवाहनाची आठवण टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना करून देण्यात आली आहे.