आमच्यात आता बहीण भावाचं नातं राहिलेलं नाही. आम्ही आता राजकीय वैरी आहोत. राजकारणातून नात्यात वैर निर्माण झाल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. धनंजय मुंडे यांनी नात्यातल्या दुराव्याबद्दल भाष्य करुन बहीण भावाच्या नात्यात दरी निर्माण झाल्याची कबुलीच दिली. पण धनंजय मुंडे यांनी जरी नातं संपलं म्हटलेलं असलं तरी पंकजा यांनी मात्र समजूतदारपणाची भूमिका घेत, ‘असं कुणी म्हटल्याने नातं संपत नसतं अन् राहिला वैर भावनेचा विषय तर माझा कुणीही वैरी नाही’, असं म्हटलं.
“रक्ताचे नाते कधी संपत नसते. आम्ही ज्या घरात जन्मलो त्या घराचे काही संस्कार आहेत. त्यांनी जरी वैरी म्हटले असले तरी मी कोणाशी वैर बाळगत नाही. माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रू नाही. मी व्यक्तींच्या विचाराशी राजकारणाची तुलना करते. राजकारणात मला कोणी वैरी वाटत नाही. जो जनतेचा वैरी आहे. तो माझा वैरी आहे”, असं उत्तर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिलंय.
धनंजय मुंडे काय म्हणाले होते?
आमचं आता बहीण भावाचं नातं राहिलेलं नाही. आम्ही आता राजकीय वैरी आहोत. नातं अगोदर होतं. आता राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे वैरी आहोत, प्रतिस्पर्धी आहोत. वारंवार त्यांच्याकडून (पंकजा मुंडे) वादग्रस्त वक्तव्य होत आहेत. याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देखील धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिला.
पंकजा vs धनंजय; संघर्ष अन् स्पर्धेची १० वर्ष!
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातलं राजकीय वैर उभा महाराष्ट्र जाणतो. धनंजय मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. पुढे २०१४ साली पंकजांनी पराभूत करुनही राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना प्रमोशन दिलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर सोपवली. धनंजय मुंडे यांनीही पूर्ण ताकदीने ती जबाबदारी यशस्वीपणाने पेलली. दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारवर तसेच त्या सरकारमधील मंत्री पंकजा यांच्यावर विविध मुद्द्यांवरुन आरोप केले. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपली सगळी ताकद पणाला लावत पंकजा यांना पराभवाची धूळ चारली. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी होती. पंकजा मुंडे यांनीही संधी सोडली नाही. पंकजा सातत्याने या ना त्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत राहिल्या. दोन महिन्यापूर्वी राज्यात सत्ताबदल झाला, पंकजांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र पंकजांच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशा आली.