सत्तातरानंतर शिंदे गटाची ताकद दाखवून देण्याकरिता हिंदू गर्व गर्जना यात्रेचं राज्यभरात आयोजन केलं गेलंय. स्थानिक नेत्यांनी या यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटाला शह द्यावा आणि आपली शक्तीप्रदर्शनाद्वारे एकजूट दाखवावी असा यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. आज औरंगादमधील संत एकनाथ रंगमदिर येथे हिंदू गर्व गर्जना मेळाव्याचं आयोजन केलं गेलं होतं. पण नियोजित वेळ उलटून गेल्यानंतरही कार्यक्रम सुरु झाला नाही. त्यात सत्कार समारंभाने कार्यक्रमाला आणखीनच उशीर झाला. त्यामुळे अब्दुल सत्तार जरासे चिडलेले पाहायला मिळाले.
नेमकं काय झालं?
तब्बल २० वर्षांनी जिल्ह्यातील नेत्याला संदीपान भुमरे यांच्या रुपाने औरंगाबादचं पालकमंत्रिपद मिळालं आहे. त्यानिमित्ताने हिंदू गर्व गर्जना यात्रेचं औचित्य साधून आमदार प्रदीप जैस्वाल यांनी संदीपान भुमरे यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. दुपारी साडे १२ वाजता कार्यक्रम सुरु होणं अपेक्षित होतं. परंतु मान्यवरांच्या उशिराच्या आगमनाने कार्यक्रमाला सुरु होण्यास आणखीनच अवधी लागला. कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ,आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे कार्यक्रमाला उपस्थित होते. सत्तारांना कार्यक्रमाला यायला सगळ्यात उशीर झाला.
पण आज शुक्रवारच्या नमाज पठणाला जायचं असल्याने सत्तार जरासे घाईत होते. त्यांनी मंचावर येताच कार्यक्रमाचे आयोजक आमदार प्रदीप जैस्वाल यांना तशी कल्पना दिली. पण तरीही कार्यक्रमाला सुरुवात न होता सत्कार समारंभच सुरु असल्याने त्यांनी थेट माईकचा ताबा घेतला. कार्यक्रम लवकर सुरु करा अशी सूचना करतानाच थेट प्रास्ताविकाला प्रारंभ करा, असे आदेशच सत्तारांनी आयोजकांना दिले. त्यामुळे पुढील सत्कार न घेता आयोजकांनी सत्तारांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाला सुरुवात केली.