पदरात तीन वर्षांची पोरगी असताना पतीचं निधन (प्रशांत श्रीमंदिलकर)

पतीच्या निधनानंतर अनेक महिलांना त्यांचा आधार हरवल्यासारखं वाटतं. तसेच, पतीशिवाय आपण राहू शकत नाही, अशा विचारात अनेक महिला पतीच्या निधनानंतर खचून जातात. मात्र, लग्नाच्या अवघ्या पाच वर्षानंतर पतीचे निधन झाले, पाठीशी ना सासू सासऱ्यांचा आधार ना आणखी कुणाचा आधार. शिवाय, पदरात तीन वर्षांची चिमुकली लेक. आता जगायचं कसं हा विचार मनात घर करत होता. पती रिक्षा चालवायचे. मात्र, आपल्याला चालवता येत नाही. मात्र, मुलीचा विचार करुन खचून न जाता पुण्यातील सविता कुंभार यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकला.
संसाराचा गाडा हाकण्याचा संघर्ष

सविता यांचा १९९५ मध्ये संजय कुंभार यांच्याशी विवाह झाला होता. त्यांचा सुखी संसार सुरू असताना अचानक पतीचं निधन झालं आणि त्यांच्यावर आभाळ कोसळलं. सारी स्वप्नं उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे खचून गेलेल्या सविता माहेरी गेल्या. मुलीसाठी काही तरी करावं ही भावना मनात ठेवून त्यानंतर काही दिवसात पुन्हा त्या पुण्यात परतल्या. संसाराचा चरितार्थ चालवण्यासाठी वर्षभर त्यांनी शिवणकाम करत चरितार्थ चालविला. त्यानंतर रिक्षा परवाना मिळवून रिक्षा चालविण्यास सुरुवात केली.
पतीच्या निधनाने खचून गेल्या नाहीत

कुणाचाही आधार नसताना सविता यांनी पतीच्या निधनानंतर खचून न जाता स्वतः जिद्दीने उभ्या राहिल्या आणि त्याच जिद्दीने त्यांनी मुलीचे चांगले शिक्षण केले, तिचे लग्न केले. मुलांना शाळेत सोडत असताना अनेक पालकांना त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आणि तो आजही कायम आहे. पुण्यासारख्या नवख्या शहरात एका स्त्रीने स्वतःला सिद्ध करणे तशी खूप अवघड गोष्ट आहे. मात्र, सविता कुंभार यांनी हे जिद्दीने पूर्ण केले. गेल्या २५ वर्षांपासून त्या हा गाडा हाकत आहेत.
आजपर्यंत ४५ पुरस्कारांनी सन्मान

मुलीला लहान पणापासून ते तीच लग्न होईपर्यंत स्कूल व्हॅन चालवूनच मोठे केले. त्यांना आजपर्यंत ४५ पुरस्कार मिळाले असून त्या पुण्यातल्या पहिल्या महिला चालक म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सध्या त्या वाहन चालक संघटनेच्या उपाध्यक्षा म्हणून काम करत आहेत. तसेच, कुंभार समाजाच्या जिल्हा कार्यकारणीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. सविता कुंभार यांनी स्वतः सिद्ध करुन उभा केलेला संसार आज सर्वांना आदर्शवत करणारा असा आहे. आजच्या युगातील या नव दुर्गेला सलाम करावा तेवढा थोडाच आहे.