वाशिम: देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना वाशिममध्ये घडली आहे. कनेरगाव नाका येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेला राज्य महामार्गावरील टोलनाका वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना काल दुपारी घडली. सुदैवाने कोणत्याही वाहनाला किंवा कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही.
जिल्ह्यात काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास वाशिम हद्दीतील तोंडगाव फाट्याजवळ पावसाला सुरुवात झाली. दरम्यान वादळवाराही सुटला. या वादळातच महामार्गावरील टोलनाका अचानक कोसळला. यावेळी रस्त्यावर वाहतूक नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
टोलनाका पडल्यामुळे बाजूने वाहनांना पर्यायी रस्ता देण्यात आला होता. यामुळे वाहतूक काही वेळातच सुरळीत झाली. दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने ३० सप्टेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. काल जिल्ह्यात बहुतांश ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी वादळासह पाऊस कोसळला. ज्या भागात पाऊस कोसळला नाही, त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.