नाना पटोले यांच्या टीकेनंतर आता भाजप राज्य सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “डोक्यावर परिणाम झाल्यावर तो किती खोलवर होतो, याचं नानांपेक्षा दुसरं उदाहरण कोणीच असू शकत नाही! गरज लागली तर नानांनी मोकळेपणानं सांगावं, येरवड्यात पोहोच करण्याची सगळी व्यवस्था करु”! अशी जोरदार टीका मोहोळ यांनी केली आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले ?
“सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माध्यमांसमोर येऊन आम्हाला वाचवा असं सांगतात. आता न्यायव्यवस्थाही धोक्यात आली आहे. प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वन अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. आता तर युपीएससीची परीक्षा नाही, नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट संयुक्त सचिव पदावर जातो असं चित्र आपण पाहत आहोत,” अशी जोरदार टीका नाना पटोले यांनी केली आहे.
राम कदम यांनी घेतला नाना पटोलेंचा समाचार
हाफ पॅन्टचे एवढंच कौतुक असेल तर नाना पटोले यांनी एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जावे. तेथे गेल्यानंतर नाना पटोले यांना देशप्रेम काय असते, हे कळेल. देशप्रेम काय आहे, समर्पित भाव काय आहे, देशासाठी कसं झिजायचं असते, हे नाना पटोलेंना कळेल. असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे.