मुंबई: शिवसेना कोणाची हा वाद सुरू असताना आता पक्षातील दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली आहे. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात संघर्ष सुरू असताना आता जमिनीवरही संघर्ष पेटला आहे. शिवसेनेच्या इतिहासात दसरा मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच मेळाव्याच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येईल.

शिवसेनेचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कात होतो. शिवसेनेतील फुटीमुळे यंदा या मैदानावरूनही वाद झाला. तो मुंबई उच्च न्यायालयात गेला. अखेर न्यायालयानं उद्धव ठाकरेंच्या बाजूनं निकाल दिला. त्यामुळे ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण आहे. शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होत आहे. बीकेसीतील मैदान शिवाजी पार्कापेक्षा मोठं आहे. त्यामुळे शिंदे गटानं जय्यत तयारी केली आहे.
छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; चेंबुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गट टायमिंग साधण्याच्या प्रयत्नात आहे. दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यात भाषणांवरून कुरघोडी होण्याची चिन्हं आहेत. शिवाजी पार्कातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषण करावं, अशी योजना शिंदे गटानं आखली आहे. शिंदेंनी ठाकरेंनंतर भाषण केल्यास त्यांना ठाकरेंच्या भाषणाला प्रत्युत्तर देता येईल. त्यांचे मुद्दे खोडून काढता येतील, असं शिंदे गटातील नेत्यांना वाटतं. ठाकरेंचं भाषण रात्री ८च्या सुमारास सुरू होतं. ते साधारणत: ९ वाजता संपतं. त्यामुळे शिंदेंनी ९ नंतर भाषणास सुरुवात करावी, अशी शिंदे गटाची योजना आहे.
शिवसेना- शिंदे गटात टीझर वॉर; शिंदे गटाच्या झेंड्यात बाळासाहेब आणि दिघेंचे छायाचित्र
गेल्या महिन्यातील पॅटर्नची पुनरावृत्ती?
गेल्या महिन्यात, २१ सप्टेंबरला मुंबईच्या गोरेगावात उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी शिंदेंवर तोंडसुख घेतलं. शिंदे गटाचा उल्लेख त्यांनी मिंधे गट असा केला. मुलं पळवणारी टोळी असते. तशी आता बाप पळवणारी टोळी आली असल्याचं म्हणत त्यांनी शिंदेंवर तिखट शब्दांत हल्ला चढवला.

२१ सप्टेंबरला एकनाथ शिंदे दिल्लीत होते. मुंबईत ठाकरेंचं भाषण संपल्यानंतर दिल्लीत शिंदेंचं भाषण सुरू झालं. आम्ही मिंधे नाही, तर बाळासाहेबांचे खंदे आहोत, असा शब्दांत त्यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. तुम्हाला बापाचा विचार विकणारी टोळी म्हणू का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here