औरंगाबाद : शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक मोठा हादरा औरंगाबाद जिल्ह्यात बसला. कारण जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मात्र ठाकरेंसोबत एकनिष्ठेने उभे राहिले. त्यामुळे जिल्ह्यात शिंदे विरुद्ध ठाकरे गटात आक्रमक शाब्दिक युद्ध सुरू असून चंद्रकांत खैरे यांनी दसरा मेळाव्याबाबत गंभीर आरोप केला आहे.

बीकेसी मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून ३६ जिल्ह्यांसाठी ५२ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसंच त्यांच्याकडे इतके पैसे कुठून आले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात माझ्याकडे पुरावे असल्याचंही खैरे यांनी सांगितलं आहे.

खडसेंनंतर आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे अमित शहांना भेटले, राजकीय चर्चांना उधाण

चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटात गेलेले पक्षाचे नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांना थेट आव्हान दिलं आहे. मी आता मैदानात उतरलोय, काय होईल ते बघून घेऊ, अशा शब्दांत खैरे यांनी संदिपान भुमरे यांनी इशारा दिला आहे. तसंच मी एकनाथ शिंदेंकडून २० लाख रुपये आणले हे सिद्ध करा, अन्यथा सुळावर चढा असंही आव्हान त्यांनी दिलं आहे. संदिपान भुमरे यांनी त्यांच्या मतदारसंघात कोणाला मोठं होऊ दिले नाही. सगळा खोटरडापणा लावला आहे. मी त्याला मोठं केलं आहे, त्याने एक झेंडा देखील लावला नाही, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.

दरम्यान, पालकमंत्री झाल्यानंतर संदिपान भुमरे यांच्या प्रत्येक निर्णयावर माझं लक्ष आहे. हे सर्व आमदार आगामी निवडणुकीत पडतील, हे मी ठामपणे सांगतो, असा हल्लाबोलही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here