मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत बंडखोर गटात दाखल होणाऱ्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची रांग लागली आहे. शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच अनेक जिल्हाप्रमुखांसह संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्यासोबत बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर आता शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्याबाबतही उलट-सुलट चर्चा सुरू असून नार्वेकर हेदेखील शिंदे गटात जातील, असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडून जातील असं मला वाटत नाही,’ असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. तसंच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेतून बंड करत बाहेर पडले तेव्हादेखील नार्वेकर हे पक्ष सोडणार, अशी चर्चा होती. मात्र ते कुठेही गेले नाहीत. त्यामुळे आगामी काळातही ते उद्धव ठाकरेंसोबतच राहतील, असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

पुरुषार्थ हे पुस्तक मला नाही, उद्धव ठाकरेंना द्या, नारायण राणेंची बोचरी टीका

नार्वेकरांच्या प्रवेशावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला दुजोरा देण्याचं सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळलं आहे. नार्वेकर यांच्याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘माझं वागणं पोटात एक आणि ओठात एक असं नसतं. जे असतं ते खुल्या दिल्याने मी आपल्याला सांगतो. लपवून ठेवण्याचा माझा स्वभाव नाही, हे आपण मीडियातील सर्वजण जाणता. पण मिलिंद नार्वेकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही,’ असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदेही झाले विद्यार्थी, खुर्चीवर न बसता बसले बेंचवर, म्हणाले…

नार्वेकर यांच्याबाबत संभ्रम निर्माण होण्याचं कारण काय?

मिलिंद नार्वेकर हे गेल्या अनेक दशकांपासून उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहात आहेत. शिवसेना सोडताना अनेक नेत्यांनी मिलिंद नार्वेकर यांना जबाबदार धरत गंभीर आरोप केले होते. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्यातील अंतर कमी झाले नाही. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर घडलेल्या काही घडामोडींमुळे संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना निर्णयप्रक्रियेतून दूर केल्याचं बोललं जात आहे. तसंच मुख्यमंत्री शिंदे यांनी नार्वेकर यांच्या घरी गणेश दर्शनाला दर्शवलेली उपस्थितीदेखील चर्चेचा विषय ठरली होती. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मिलिंद नार्वेकर खरंच काही वेगळा निर्णय घेतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here