कोल्हापूर : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसायाचा पर्याय निवडतात. अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून कोल्हापुरातील गोकुळ दूध संघात विशेष प्रकल्प राबवण्यात येणार आहे. गायी आणि म्हशींची गर्भधारणा झाली आहे की नाही, हे तपासणं आता सहज शक्य होणार आहे. तसंच सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन प्रकल्पांतर्गत गायीमध्ये गर्भ प्रत्यारोपण करून उच्च वंशावळीच्या फक्त मादी वासरांची पैदास करण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत प्रथमच आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे गायींमध्ये गर्भ प्रत्यारोपण करण्याचा प्रयोग गोकुळ दूध संघात करण्यात येत आहे. एनडीडीबीमार्फत गोकुळ संलग्न दूध संस्थेमध्ये पुढील तीन वर्षासाठी निवडक ५०० जनावरांमध्ये गर्भ प्रत्यारोपण करण्यात येणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पहिल्या टप्प्यात गायी आणि दुसऱ्या टप्प्यात म्हशींवर आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे गर्भ प्रत्यारोपण होणार आहे. शिवाय गायी-म्हशींच्या गर्भधारणांची खात्री आता फक्त २८ दिवसात होणार आहे. किटद्वारे ही तपासणी होणार असून यामुळे शेतकऱ्यांचे गर्भधारणा झाली की नाही, ही खात्री करण्यासाठी लागणारा तब्बल २ महिन्यांची वेळ कमी होणार आहे. २०२२-२३ या वर्षांमध्ये गायींचे ४० गर्भ व म्हशीचे ११० असे एकूण १५० गर्भ मंजूर झाले आहेत. या प्रकल्पामुळे दूध उत्पादकांच्या गोठ्यामध्ये कमी कालावधीत म्हणजेच एका पिढीमध्ये जातिवंत व फक्त मादी वासरांची पैदास होणार आहे.

ड्रॅगन फ्रुट शेतीला प्रोत्साहन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अनुदान देणार

या तंत्रज्ञानाद्वारे जन्मास येणारी वासरे उच्च वंशावळची असून त्यांचे दूध उत्पादन गायीमध्ये प्रति वेत ६ हजार लिटरपेक्षा अधिक तर म्हशीमध्ये प्रतिवेत ४ हजार लिटरपेक्षा अधिक राहणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या दूध उत्पादकांना संघाच्या वतीने खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

गर्भधारणेची खात्री करणे झाले सोपे

गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, या कार्यक्रमांतर्गत गर्भ प्रत्यारोपण करण्यासाठी २१ हजार रुपयांचा खर्च आहे. जनावर गाभण राहण्याची खात्री झाल्यानंतर प्रत्येक जनावरांसाठी केंद्र सरकारकडून ५ हजार तर गोकुळ दूध संघाकडून ७ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थी दूध उत्पादकांच्या दूध बिलातून कपात करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ५०० गर्भ प्रत्यारोपणासाठी गोकुळ दूध संघामार्फत २५ लाख इतके अनुदान दूध उत्पादकांना देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here