पुणे : दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंनी शिवसेना काय करू शकते हे दाखवणं सुरु केलंय. बंडखोरांना त्यांच्याच मतदारसंघात मात देऊन धडा कसा शिकवायचा याची तयारी उद्धव ठाकरे करतायेत. शिवाजीराव आढळराव पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात जागा दाखवून देता देता खेड तालुक्यात मित्र पक्षाचं अस्तित्वच ठाकरेंनी संपुष्टात आणलंय… एकेकाळी खेडमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याला शिवसेनेत घेऊन ठाकरेंनी तेथील राजकीय गणितं बदलली आहेत. काँग्रेसला आता खेडमध्ये अस्तित्व शोधण्याची वेळ आलेली असताना उद्धव ठाकरेंनी एक फासा टाकलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने उद्धव ठाकरे यांना राजकीय धक्का देऊन राज्यात वेगळे अस्तित्व निर्माण केले. मात्र राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असणाऱ्या खेड तालुक्यात त्यांना म्हणावी अशी साथ मिळाली नाहीये. राज्यात शिवसेनेची पडझड होत असताना खेडमध्ये ठाकरेंना अमोल पवार यांच्या रुपाने आक्रमक चेहरा मिळाळा असून पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचं तगडा गडी म्हणून त्यांचं स्वागत केलंय.

खेडची स्थानिक गणितं कशी?

  • खेड मतदार संघातली ताकद
  • खेड आळंदी मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते आहेत
  • हा मतदारसंघ पुण्यातील शिरूर या विधानसभा मतदार संघात येतो
  • त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो
  • मात्र शिवसेनेने हळू हळू इथे आपली पकड घट्ट केली
  • आणि शिवसेनेकडून पहिल्यांदाच आमदार सुरेश गोरे इथे निवडून आले होते
  • पण शिवसेना आणि राष्ट्रवादीत इथे कमालीचा संघर्ष आहे
  • इथली स्थानिक गणितं ही नेहमी पक्षनेतृत्वाचं टेन्शन वाढवतात

दादाच्या मनात काय सायबाला तरी कळलंय का? एक दिवस बरोबर झटका देणार, बापू बरंच बोलून गेले!
शिवसेना बदला घेणार?

ऑगस्ट २०२१ मध्ये खेड पंचायत समिती सभापतीपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच झुंपली होती. त्यानंतरही खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा पाहायला मिळाला होता. दुसरीकडे बहुमत असूनही शिवसेनेला जबर धक्का बसला होता. खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र, शिवसेना सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानं सभापतीपदावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळाला. आता आगामी काळात शिवसेना हाच बदला अमोल पवार यांच्या रुपाने घेणार असल्याचं सांगितलं जातंय…

मिलिंद नार्वेकर तुमच्या साथीला येतायेत? एकनाथ शिंदे म्हणतात, लपवायचं काय, आपलं रोखठोक असतंय!
अमोल पवार कोण?

  • माजी आमदार नारायणराव पवार यांच्या विचाराने राजकारणात प्रवेश
  • पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले
  • काँग्रेसचे एकमेव पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिले
  • त्यानंतर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम पाहिले
  • खेड मतदारसंघात अमोल पवार यांचा चांगला जनसंपर्क
  • अमोल पवारांनी ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेत सेनेचा भगवा खांद्यावर घेतलाय
  • शिवसेना प्रवेशामुळे खेड तालुक्यातील काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर
  • आगामी २०२४ च्या निवडणुकीत खेड विधानसभेवर भगवा फडकावणार

ठाकरे पवारांना बळ देणार!

खेड तालुक्यात दोन माजी उपसभापती वगळले तर शिंदे गटातल्या आढळरावांना आणखी म्हणावी अशी पदाधिकाऱ्यांची साथ मिळालेली नाहीये. सेनेच्या निष्ठावंतांनी अजूनही ठाकरेंबरोबरच राहणं पसंत केलं आहे. अशातच आज काँग्रेसचे एकमेव पंचायत समिती सदस्य आणि माजी उपसभापती अमोल पवार यांनी ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेत सेनेचा भगवा खांद्यावर घेतलाय. जुन्या निष्ठावंत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरची निष्ठा कायम ठेवली आहे. त्यामुळे खेडमध्ये सेनेची वोट बँक पुन्हा मजबूत करण्यासाठी ठाकरेंकडून अमोल पवार यांना बळ दिलं जाणार हे नक्की.

अमोल पवार यांच्या रूपाने एक तगडा गडी शिवसेनेला मिळाला आहे, अशी भावना पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलीये. खेडचे माजी आमदार तथा शिवसेना नेते सुरेश गोरे यांचं कोरोना काळात निधन झाल्याने त्यांच्या जागेवर शिवसेना पर्यायी उमेदवाराच्या शोधात आहे. आता अमोल पवार यांच्या रुपाने शिवसेनेला तगडा गडी मिळाल्याचं उद्धव ठाकरेंनीच बोलून दाखवल्याने त्यांच्या पुढच्या राजकीय करिअरविषयी जोरात चर्चा सुरु झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here