सास्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्राच्या वनविभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना सरकारी कामाशी संबंधित फोन आल्यावर वंदे मातरम म्हणत प्रतिसाद देण्याचे आदेश दिले होते. वनविभागाने एक जीआर जारी केला होता. त्यानुसार सर्वसामान्य नागरिक आणि सरकारी कामाशी संबंधित लोकप्रतिनिधींचे फोन अटेंड करताना वनविभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हॅलोऐवजी वंदे मातरम बोलण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचवेळी, आता राज्य सरकारने सर्व सरकारी अधिकाऱ्यांना नमस्कार ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्याचा जीआर जारी केला आहे.
स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिकमंत्र्यांनी केली होती घोषणा
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्य दिनापूर्वीच या संबंधात भाष्य केले होते.आम्ही स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी नमस्तेऐवजी फोनवर वंदे मातरम असे म्हणावे असे मला वाटते, असे मुनगंटीवार म्हणाले होते. याबाबतचा औपचारिक शासन आदेश लवकरच जारी केला जाईल, असेही ते म्हणाले होते. पुढच्या वर्षी २६ जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी फोनवर वंदे मातरम् म्हणावे असे मला वाटते, असेही ते म्हणाले होते.
या निर्णयाला झाला होता विरोध
सांस्कृतिक मंत्र्यांच्या या आदेशानंतर अनेक मुस्लिम संघटनांनी आक्षेपही घेतला होता. या निर्णयावर आक्षेप घेत मुंबईच्या रझा अकादमीकडून आम्ही फक्त अल्लाहची पूजा करतो, त्यामुळे वंदे मातरम्ऐवजी दुसरा पर्याय द्यावा, असे म्हटले होते.