म. टा. प्रतिनिधी, जळगाव: ‘पाच, दहा वर्षे कशाला पाहिजे? आताच घ्या ना,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच पाच ते दहा वर्षांनंतर निवृत्ती घेणार असल्याच्या आशयाचे वक्तव्य केले होते, यावरून खडसेंनी पाटलांना हा टोला लगावला.

खडसे म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही, ते विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते. त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. गेल्या काळात पक्षाने त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या; मात्र आता पक्षातले वातावरण त्यांना आवडत नसावे, या वातावरणात पुढच्या काळात राजकारण अवघड आहे असे वाटल्याने राजकारणापासून वेगळे होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल.’
पालकमंत्री होताच चंद्रकांतदादांचा अजित पवारांना धक्का, ८६५ कोटींच्या कामांमध्ये फेरबदल?
‘…म्हणून मुंडे राष्ट्रवादीत येणार नाहीत’

रक्ताची नाते कधी संपत नसतात, असे मत भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत व्यक्त केले होते. यावर बोलताना खडसे म्हणाले की, ‘पंकजा मुंडे यांनी काही तरी वक्तव्य केले म्हणून सुतावरून स्वर्ग गाठण्याची गरज नाही. राजकारणात नाते जोपासले पाहिजे. यातूनच ओघवत्या शब्दात पंकजा मुंडे या बोलल्या असाव्यात.’

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

पुण्यातील एसएनडीटी विद्यापीठात चंद्रकांत पाटील यांनी भाषणादरम्यान एक वक्तव्य केलं. पुढील शंभर वर्षांची दृष्टी आपल्याकडे नाही, आणि आपल्याला त्यात रसही नाही. कारण आपल्याला अजून ५-१० वर्ष काम करुन जायचंय, असं पाटील बोलण्याच्या ओघात म्हणाले. परंतु त्यावरुन चंद्रकांत पाटलांना निवृत्तीचे वेध लागल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांचे एक वक्तव्य प्रचंड गाजले होते. मी कोणतीच निवडणूक आजपर्यंत हरलेलो नाही. कोल्हापूरमधून आजही लढण्यास तयार आहे आणि तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे आव्हानात्मक उद्गार नोव्हेंबर २०२० मध्ये काढल्याने चंद्रकांत पाटील चर्चेत आले होते. त्यावरुन अनेकदा विरोधक त्यांना आजही डिवचतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here