ग्वाल्हेर: मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये गुरुवारी संध्याकाळी संशयास्पद स्थितीत जळालेल्या स्थितीत आढळून आलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रेश्माच्या मृत्यूआधीचा व्हिडीओ समोर आला आहे. एका नातेवाईकानं रुग्णालयात रेश्माचा व्हिडीओ चित्रित केला.

व्हिडीओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीनं रेश्माला आग कोणी लावली, असा प्रश्न विचारला. त्यावर रेश्मानं सासूनं आग लावल्याचं सांगितलं. यावेळी पती वासू कुठे होता, असा प्रश्न नातेवाईकानं विचारला. त्यावर ते तिथेच उभे होते, असं उत्तर रेश्मानं दिलं. यानंतर तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. रेश्मानं २४ तासांच्या उपचारांनंतर अखेरचा श्वास घेतला. प्राणज्योत मालवेपर्यंत रेश्माच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. आपल्यासोबत विश्वासघात झाल्याची खंत तिनं बोलून दाखवली. आता मला बरं व्हायचंय आणि माझ्या मुलासाठी जगायचंय, असं रेश्मा म्हणाली होती. मात्र ते तिचे अखेरचे शब्द ठरले.
ट्रेनमध्ये पतीला हृदयविकाराचा झटका; मृत्यू दिसू लागला, पत्नीनं ‘सावित्री’ होऊन जीव वाचवला
सेवा नगरात वास्तव्यास असणाऱ्या रेश्माचा दोन वर्षांपूर्वी मुरार येथील सत्यनारायण संतर येथे राहणाऱ्या वासू शिवहेर नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह झाला. दोघांचे धर्म वेगळे होते. या लग्नाला दोन्ही कुटुंबांचा विरोध होता. रेश्मा तिचा पती वासूसोबत वेगळी राहायची. सासू रजनी शिवहरेसोबत तिचा वाद व्हायचा. गुरुवारी संध्याकाळी रेश्माला जयारोग्य रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं. ती गंभीर भाजली होती.

रेश्माला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजताच तिच्या माहेरच्या माणसांनी रुग्णालय गाठलं. मात्र तिथे तिची सासरची माणसं नव्हती. रेश्माच्या कुटुंबियांनी वासूच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. वासूच्या कुटुंबानंच रेश्माला पेटवल्याचा आरोप त्यांनी केला.
कामगार साफसफाईला निघाला; विमानतळावर शंका आली; मॉपच्या दांड्यानं ‘सफाई’ उघडी पडली
घटनेची माहिती मिळताच मुरार पोलीस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी गंभीर भाजलेल्या रेश्माचा जबाब नोंदवला. सासू रजनी शिवहरेंनी आपल्यावर पेट्रोल टाकून जाळलं. त्यावेळी पती वासू तिथेच होता. मात्र त्यानं आपल्याला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही, असा जबाब रेश्मानं पोलिसांना दिला. आता मुरार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी रेश्माच्या सासूला अटक केली आहे. तर तिचा पती फरार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here