msrtc employee, शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहीत निष्ठा दाखवली; नंतर उद्धव ठाकरेंनी दिला सुखद धक्का – msrtc bus st conductor supported shivsena chief uddhav thackeray by writing a letter with his own blood
धुळे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठं वादंग सुरू आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्याने खरी शिवसेना आमचीच, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात असतानाच शिवसैनिक आपली निष्ठा व्यक्त करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या धुळे जिल्ह्यातील एका समर्थकाने तर थेट रक्तानेच पत्र लिहिलं आहे.
एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असलेले तसेच एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मनोज गवळी यांनी रक्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत पक्षावरील निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर उद्धव यांनी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधत मनोज गवळी यांना थेट मातोश्रीवर बोलावून घेतले. गवळी मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसंच पक्षावर दाखविलेल्या निष्ठेबद्दल आभार देखील व्यक्त केले.
दरम्यान, यावेळी मनोज गवळी यांच्यासोबत एसटी कामगार सेनेचे आय. एन. मिर्झा हे देखील उपस्थित होते. मातोश्रीवरुन मिळालेल्या प्रतिसादानंतर गवळी भारावून गेले.