बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांनी मातोश्रीला हफ्ता जात असे, असा आरोप केला होता. या आरोपाचे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी खंडन केले.जोपर्यंत बरोबर असतो तोपर्यंत दिवाळी, नसतो तेव्हा शिमगा असा प्रकार सुरु आहे. कोण काय आरोप करतोय, त्याचे पुरावे द्या. मला पक्षाने चार वेळेला विधानपरिषद आणि त्यानंतर उपसभापतीपद मिळालं पण त्यासाठी रुपया खर्चावा लागला नाही. उलट पक्षाने माझ्यासाठी पैसे खर्च केले, असे म्हणत गोऱ्हे यांनी आम्ही तुमच्या खासदार निधीच्या टक्केवारीचा हिशेब घ्यावा का, असा सवाल उपस्थित केला.
सध्याचे राज्य सरकार हे धूर्त आहे. शिंदे गटासोबत गेलेल्या मंडळींचे येणाऱ्या निवडणुकीत काय होते त्याची परीक्षा येत्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत दिसेल, असा दावाही गोऱ्हे यांनी केलाय. तसेच मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडून कुठे जातील असे मला वाटत नाही. नार्वेकर यांच्याबद्दल कुणीतरी अफवा पसरवत आहे. पण या चर्चांना काही अर्थ नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
निवडणुकीत शिवसेनेची मतंही भाजपच्या उमेदवाराला ट्रान्सफर झाली: नीलम गोऱ्हे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, असा आरोप भाजपकडून सातत्याने केला जातो. पण मुळात भाजपचेही उमेदवार आमच्या नेत्यांचे फोटो लावून निवडून आले. दोघांची मतं एकमेकांना ट्रान्सफर झाली, फक्त एकाच पक्षाची मतं दुसऱ्या पक्षाला मिळाली, असे झाले नाही. पण सातत्याने ठाकरे कुटुंबाची अवहेलना करायची, खिल्ली उडवण्याचा प्रकार सुरु आहे. रस्त्यावर एखादा ट्रक थांबला असेल आणि मालक कुठे गेला असेल तर काहीवेळेला ट्रकमधील माल न्यायला तुटून पडतात. तशाचप्रकारे शिवसेनेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख हे खंबीर आहेत. या सगळ्यामुळे खऱ्या शिवसैनिकाच्या मनावर कुठलाही परिणामा होणार नाही, असेही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.