Maharashtra Politics | एखाद्या आमदाराचा मृत्यू झाल्यास सहा महिन्यांच्या आत संबंधित मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे गरजेचे असते. त्यानुसार निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आता शिवसेना आणि भाजप कोणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकड या निवडणुकीसाठी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार का, हेदेखील पाहावे लागेल.

हायलाइट्स:
- शिवसेना आणि भाजपमध्ये गटात थेट लढाई
- राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईतील पहिली हायव्होल्टेज निवडणूक
शिंदे गटाने इथे उमेदवार देत पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपने आपल्या घेतल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. शिंदे गटाकडून ही जागा आपल्याकडे घेतल्यानंतर आता भाजपा निवडणूक प्रचारासाठी सज्ज झाला आहे. भाजपाकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा निवडणूक प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज भाजप मुंबई अध्यक्ष आणि अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे प्रभारी आशिष शेलार यांचे हस्ते करण्यात आले होते.
रमेश लटकेंच्या पत्नीला उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी महाविकास आघाडीतील घटकपक्षांसोबत चर्चा न केल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले होते. आम्ही यापूर्वीसुद्धा ही जागा लढवलेली असल्यामुळे उमेदवार उतरवू शकतो किंवा शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो, याबाबत पक्षांतर्गत चर्चेनंतर निर्णय होईल, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले होते. त्यामुळे आता काँग्रेस याठिकाणी ऐनवेळी आपला उमेदवार उतरवणार का, हे पाहावे लागेल. भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्यामुळे ही पोटनिवणूक जिंकण्यासाठी शिवसेनेला महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीची गरज आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.