पूर्वी मीरारोड येथे वास्तव्याला असलेला अक्षय राणे हॉटेल मॅनेजमेंट करून नोकरीसाठी फ्लोरिडात स्थायिक झाला आहे. परंतु, त्याठिकाणी गेल्यानंतरही अक्षयच्या मनात शिवसेनेविषयी असलेले प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. अक्षय राणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानतो. त्यामुळे शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार बाहेर पडल्यानंतर अक्षय कमालीचा अस्वस्थ झाला होता. शिवसेनेसोबतच राहा, उद्धवसाहेबाची साथ सोडू नका असे तो येथील अनेक मित्रांना फोन करून सांगत होता. त्यानंतर दसरा मेळाव्याची उत्सुकता अक्षयला होती. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला आणि दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार हे स्पष्ट झाले. मग अक्षयच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर आत तो दसरा मेळाव्यासाठी ८० हजार रुपयाचे तिकीट काढून मुंबईत दाखल झाला आहे.
‘शिवसैनिक’ या फेसबुक पेजवर अक्षयच्या या निष्ठच्या प्रवासाची पोस्ट टाकण्यात आली आहे. त्या पोस्टवर कमेंटच वर्षाव सुरू आहे. ‘मित्रा, तुझ्या निष्ठऽला सलाम’, ‘भावा ग्रेट’, ‘याला म्हणतात निष्ठा’, ‘असे निष्ठावंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत कितीही फुटीर झाले तरी फरक पडत नाही, जय महाराष्ट्रा, यासारख्या कर्मेटच्या माध्यमातून नेटकरी अक्षयचे कौतुक करत आहेत.
अक्षयचे मित्रही फ्लोरिडातून दसरा मेळावा पाहणार
अक्षय यंदा दसरा मेळाव्याला फ्लोरिडातील मित्रांनाही घेऊन येणार होता. त्याचा जवळचा मित्र अल्सएंड्रो याने तर मेळाव्याला येण्याचेही ठरवले होते. परंतु कुटुंबातील व्यक्ती आजारी असल्याने तो अक्षयसोबत येऊ शकला नाही. त्यामुळे आता अल्सएंड्रो फ्लोरिडा येथून दसरा मेळावा पाहणार आहे. अक्षय त्यांना उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे भाषांतर करुन सांगणार आहे.
फक्त दसरा मेळाव्यासाठी इतक्या दूरवरून मुंबईत का आलास?
‘दसरा मेळाव्यासाठी सुट्टी घेऊन तू इतक्या लांब का आलास, असे अक्षयला येथील मित्र विचारत आहेत. त्यावर अक्षय राणेने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले आहे. कोविड काळात महाराष्ट्रात तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थिती समर्थपणे हाताळली. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून ते या संकटात उभे राहिले, अशा देवासमान माणसाला मराठी माणसाने साथ द्यायला हवी म्हणून मी अमेरिकेतून येथे आलो आहे. मी माझे कर्तव्य निभावत आहे, असे अक्षयने सांगितले.