यावेळी शरद पवार यांनी जेष्ठत्वाच्या नात्याने शिवसेना आणि शिंदे गटाला एक सल्ला देऊ केला. मुख्यमंत्री हे फक्त पक्षाचे नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. दसरा मेळावा जरूर घ्यावा. पण यावेळी वातावरणात कटुता निर्माण होईल, अशी मांडणी भाषणांमधून होता कामा नये, अशी अपेक्षा दोन्ही बाजूंकडून आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मदत करत असल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. या सगळ्या गोष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीही संबंध नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांचा चव्हाणांना खोचक टोला
२०१४ साली शिवसेना युतीचा प्रस्ताव घेऊन काँग्रेसकडे आली होती. पण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर भाजपला पाठिंबा दिल्याने त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले नाही, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसला कोणीही असा प्रस्ताव दिला असता तर मला थोडीफार माहिती असती. राष्ट्रवादीत अन्य नेत्यांनाही निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. पण त्यांनी किमान ही गोष्ट माझ्या कानावर घातली असती. पण अशोक चव्हाणांनी असा काही प्रस्ताव दिल्याचे मी कधीचं ऐकलं नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा
अंधेरी पूर्व जागेसाठी पोटनिवडणूक होते आहे. भाजप आणि शिवसेनेत सामना होणार आहे, आपला पाठिंबा कुणाला, या पत्रकारांच्या प्रश्नांवर क्षणाचाही विलंब न लावता राष्ट्रवादीची ताकद आम्ही शिवसेनेच्या पाठीमागे उभी करु, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. महिनाभरावर आलेल्या निवडणुकीत अंधेरीपूर्व जागेवर आम्ही शिवसेनेला सहकार्य करु, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.