मुंबई : अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. निवडणूक आयोगाने त्यासंबंधीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. भाजप आणि शिवसेनेत येथे सामना होतो आहे. दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे तर भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिलीये. शिवसेनेत ऐतिहासिक बंड झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय किंबहुना ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. अशातच या निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ कुणाला मिळणार? राष्ट्रवादी आपली ताकद कुणाच्या मागे उभी करणार? या प्रश्नाचं उत्तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात आहेत. पुणे नवरात्र महोत्सवात महर्षी पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांच्याबरोबर या कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे, विश्वजीत कदम, उल्हास पवार आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शिवसेनेचा दसरा मेळावा, शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये सुरु असलेली स्पर्धा तसेच अंधेरीच्या पोटनिवडणुकीवर त्यांनी रोखठोक भाष्य केलं.

आपला पाठिंबा कुणाला, पवार म्हणाले….

अंधेरी पूर्व जागेसाठी पोटनिवडणूक होते आहे. भाजप आणि शिवसेनेत सामना होणार आहे, आपला पाठिंबा कुणाला असणार? या पत्रकारांच्या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न लावता राष्ट्रवादीची ताकद आम्ही शिवसेनेच्या पाठीमागे उभी करु, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. महिनाभरावर आलेल्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या जागेवर आम्ही शिवसेनेला सहकार्य करु, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दसरा मेळावा आणि राष्ट्रवादीचा काडीचा संबंध नाही- पवार

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मदत करत असल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. या सगळ्या गोष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीही संबंध नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Dasara Melava: दसरा मेळाव्यात एवढं एक पथ्य जरुर पाळा; शरद पवारांचा शिवसेना-शिंदे गटाला सल्ला
३ नोव्हेंबरला मतदान, ६ नोव्हेंबर रोजी निकाल

निवडणूक आयोगाकडून सोमवारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदारसंघात मतदान होईल. तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

भाजपने शिंदे गटाकडून जागा हिसकावली

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत हदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. एखाद्या आमदाराचा मृत्यू झाल्यास सहा महिन्यांच्या आत संबंधित मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे गरजेचे असते. त्यानुसार निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. शिंदे गटाने इथे उमेदवार देत पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपने आपल्या घेतल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here