बुलढाणा : राज्यभर सध्या नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथे मात्र या उत्साहाला गालबोट लागल्याची घटना घडली. जानेफळ या गावात नवरात्रोत्सवानिमित्त गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गरबा खेळत असताना रविवारी रात्री एका ४७ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विशाल पडधारिया (वय-४७) असं मृत हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे.
रविवारी रात्री गावातील वीर सावरकर दुर्गा मंडळासमोर ते गरबा खेळत होते. यावेळी विशाल यांना अचानक भोवळ आली. गरबास्थळावरील अन्य उपस्थितांनी त्यांना तातडीने रूग्णालयात हलवले. मात्र, वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या आकस्मिक घटनेमुळे क्षणभरातच गरबास्थळी शोकाकुल वातावरण झाले. विशाल पडधारिया यांच्या आकस्मित निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जानेफळ येथील व्यावसायिकांनी आज स्थानिक बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.