मित्राला दिलेलं वचन पूर्ण करु शकलो नाही, याची खंत वाटली. पण पुन्हा काही महिन्यांनी त्यांना तिकीट दिलं, निवडूनही आणलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही. ते मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, केंद्रात गृहमंत्रिपद भूषवलं, उर्जा खात्यासारखं महत्त्वाचं खातं त्यांनी सांभाळलं, पुढे ते राज्यपालही झाले. मागास जातीतून आलेला एखादा साधा माणूस एवढं मोठं काम करु शकतो, हे सुशीलकुमारांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं”, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.

 

Sharad pawar And SushilKumar Shinde
शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे
पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मैत्रीचे किस्से अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. वेगवेगळ्या पक्षात राहून राजकारणापलीकडची मैत्री दोघांनीही जपलीये. अगदी आपल्या राजकारणाच्या पदार्पणावेळी शरद पवार यांनी कशी साथ दिली होती, हे सुशीलकुमार शिंदे जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा आवर्जून सांगत असतात. आज शरद पवार यांनी आपल्या मित्राचं तोंडभरुन कौतुक केलं. निमित्त होतं महर्षी पुरस्कार सोहळ्याचं… यावेळी त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याविषयीचा एक भावनिक प्रसंग सांगितला.

“सुशीलकुमार शिंदे पोलीस खात्यात नोकरीला होते. आमची आणि त्यांची खूप खास मैत्री होती. राजकारण-समाजकारणाची त्यांनी आवड होती. समाजाविषयी तळमळीने काम करण्याची त्यांची जिद्द मला कायम दिसायची. त्याच उद्देशातून त्यांना मी नोकरी सोडायला लावली अन् आमदारकीचं तिकीट देतो असं सांगितलं. माझ्या सांगण्यावरुन त्यांनीही पोलीस फौजदाराची नोकरी सोडली. पण खूप प्रयत्न करुनही काँग्रेस पक्षाच्या त्यावेळच्या वरिष्ठांनी सुशीलकुमार शिंदेंना तिकीट दिलं नाही. त्यानंतर मला जेव्हा मुंबई विमानतळावर सुशीलकुमार शिंदे भेटले, त्यावेळी माझे डोळे पाण्याने डबडबले होते. मी आपल्या मित्राला दिलेला शब्द पाळू शकलो नाही, अशी भावना माझ्या मनात होती. मात्र त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनीच माझी समजूत काढली, अशी भावनिक आठवण आज शरद पवार यांनी सांगितली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात आहेत. पुणे नवरात्र महोत्सवात ‘महर्षी’ पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. हा पुरस्कार सुशीलकुमार शिंदे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला पवारांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हास पवार होते तर विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. सुशीलकुमार शिंदे यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर मंचावरील दिग्गज नेत्यांनी गतकाळातील जुन्या आठवणी जागवल्या.

अन् माझ्या डोळ्यातून टचकन पाणी आलं….!

पवार म्हणाले, “सुशीलकुमार शिंदे यांनी अतिशय गरिबीत दिवस काढले. त्यांचा संघर्ष मोठा होता. संघर्षातून त्यांनी फौजदार पदापर्यंत मजल मारली होती. त्यावेळी पोलीस फौजदाराची नोकरी म्हणजे खूपच मोठी नोकरी होती. पण समाजकारण आणि राजकारणाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आमच्या भेटीत सातत्याने आमच्या चर्चा व्हायच्या. खूप चर्चानंतर मी त्यांना सरकारी नोकरीचा राजीनामा द्यायला सांगितला. त्यांनीही धाडस करुन नोकरीचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीत मी त्यांना तिकीट मिळवून द्यायचं वचन दिलं. ठरल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण-वसंतदादा पाटील आणि मी दिल्लीला गेलो. तिथे इंदिरा गांधी आणि बाबू जगजीवनराम यांच्याशी आमची बैठक होती. त्या बैठकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीसाठी मी खूप प्रयत्न केले. पण सुशीलकुमार शिंदेंना तिकीट नको, अशी भूमिका त्या मिटिंगमध्ये पक्षनेतृत्वाने घेतली. यानंतर मी निराश झालो. ज्यावेळी दिल्लीवरुन मुंबईत परतलो, त्यावेळी माझ्या स्वागताला सुशीलकुमार शिंदे मुंबई विमानतळावर आले होते. त्यांना समोर बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझे डोळे पाण्याने डबडबले. मित्राला दिलेलं वचन पूर्ण करु शकलो नाही, याची खंत वाटली. पण पुन्हा काही महिन्यांनी त्यांना तिकीट दिलं, निवडूनही आणलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही. ते मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, केंद्रात गृहमंत्रिपद भूषवलं, उर्जा खात्यासारखं महत्त्वाचं खातं त्यांनी सांभाळलं, पुढे ते राज्यपालही झाले. मागास जातीतून आलेला एखादा साधा माणूस एवढं मोठं काम करु शकतो, हे सुशीलकुमारांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं”, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here