जालना : सोयाबीनची मळणी करत असताना मळणी यंत्रात पडून ३३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संदीप सुधाकर गाढे (रा. बाभुळगाव, तालुका भोकरदन) असं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.
या घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह मळणी यंत्रातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
दरम्यान, या घटनेमुळे बाभुळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या सोयाबीन मळणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांनी सावधानता बाळगत मळणी यंत्रावर काम करावे. तसंच अनुभवी सहायकाशिवाय मळणी यंत्र चालू करू नये व सावधानता बाळगावी, असं आवाहन करण्यात येत आहे.