मुंबई: इंजिनियरिंगची पदवी पूर्ण झाल्यावर बड्या कंपन्यांमध्ये नोकरी करावी असं अनेकांचं स्वप्न होतं. विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रासारख्या कंपन्यांमधून करिअरची सुरुवात व्हावी अशी इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्यांची इच्छा असते. त्यासाठी हजारो फ्रेशर्स या कंपन्यांमध्ये निघणाऱ्या ओपनिंगकडे डोळे लावून बसलेले असतात. मात्र अशा शेकडो फ्रेशर्सना धक्का बसला आहे. ऑफर लेटर्स आल्यामुळे आनंदात असलेल्या शेकडो फ्रेशर्सच्या आनंदावर विरजण पडलं आहे.

विप्रो, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांनी काही महिन्यांपूर्वी फ्रेशर्सना ऑफर लेटर पाठवली. त्यानंतर ऑनबोर्डिंग प्रोसेस सुरू होणं अपेक्षित होती. मात्र तसं झालं नाही. जवळपास तीन ते चार महिने गेले. यानंतर आता कंपन्यांनी फ्रेशर्सना पत्र पाठवून जोरदार धक्का दिला आहे. कंपन्यांनी शेकडो जणांना पाठवलेली ऑफर लेटर्स रद्द केली आहेत. त्यामुळे तीन-चार महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या शेकडो जणांना झटका बसला आहे.
दिवाळीच्या तोंडावर मोठा दिलासा; खाद्य तेलाच्या बाबतीत मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असलेल्या इन्फोसिस, विप्रो आणि टेक महिंद्रानं ऑनबोर्डिंग प्रोसेसला विलंब लावल्यानंतर आता संबंधित विद्यार्थ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. तुम्हाला पाठवण्यात आलेलं ऑफर लेटर रद्द करत आहोत, अशी माहिती कंपन्यांकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ३ ते ४ महिन्यांपूर्वी या कंपन्यांमध्ये उमेदवारीसाठी अर्ज केले होते. त्यानंतर त्यांच्या मुलाखतींच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यात यशस्वी झाल्यावर त्यांना ऑफर लेटर्स आली. मात्र आता अचानक ही लेटर्स रद्द करण्यात आली आहेत.
देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या मनात चाललंय तरी काय, ग्राहकांना आणखी एक झटका देण्याची तयारी
पात्रतेचे निकष आणि कंपनीचे नियम दाखवून ऑफर लेटर्स रद्द करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. तुमची शैक्षणिक पात्रता आमच्या निकषात बसत नाही. त्यामुळे तुम्हाला पाठवलेलं ऑफर लेटर रद्द करत आहोत, असं कंपन्यांनी पत्रात नमूद केलं आहे. जगभरातील आयटी उद्योगात मरगळ येत असल्याची चर्चा असताना अशी घटना घडल्यानं आयटी क्षेत्रात चिंतेचं वातावरण आहे. विशेषत: फ्रेशर्सचं टेन्शन या घटनांमुळे वाढलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here