मुंबई : गेल्या ३० वर्षांपासून उद्धव ठाकरे यांची सावली बनून वावरणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल गेल्या चार दिवसांपासून उलट सुलट चर्चा होत होत्या. शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याविषयीचा दावा करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. नार्वेकरांनी ठाकरेंची साथ सोडणं हे अनेकांच्या पचनी पडत नव्हतं. यादरम्यान ठाकरे-नार्वेकरांच्या नात्यावरही बरीच चर्चा झाली. पण या सगळ्या चर्चांवर आता मिलिंद नार्वेकर यांनी स्वत:च पडदा टाकला आहे. कारण काल रात्री शिवतीर्थावर जाऊन ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या पाहणीचा नार्वेकरांनी आढावा घेतला तर आज दुपारी मेळाव्याचा अनुषंगाने होत असलेल्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीसाठी ते शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.

आमदार, खासदार, पदाधिकारी… एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकामागून एक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जवळचे मोठ-मोठे नेते आपल्या बाजूने वळवून घेतले. मात्र ठाकरेंचे अत्यंत विश्वासू, निकटवर्तीय किंबहुना शिवसेनेचे संकटमोचक अशी ज्यांची ख्याती आहे त्या मिलिंद नार्वेकर यांच्या गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हालचालींविषयी बरीच चर्चा झाली. बंडखोर नेत्यांशी असलेला संपर्क, फडणवीसांची घेतलली भेट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नार्वेकरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जाणं, खासदार श्रीकांत शिंदे यांची विधान भवनात घेतलेली अर्ध्या तासाची भेट, अशा विविध भेटीगाठींनी नार्वेकरांचा शिंदे गटात प्रवेश होणार की काय? अशा जोरदार चर्चा रंगल्या. पण या चर्चांना नार्वेकरांनी काल रात्री पूर्णविराम देत आपले पुढील इरादे स्पष्ट केले.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारी निश्चितीकरिता शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक संपन्न होतीये. या बैठकीला खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, नेते अनिल परब, सुभाष देसाई, वरुण सरदेसाई दाखल झाले आहेत. याच महत्त्वाच्या बैठकीकरिता मिलिंद नार्वेकर देखील शिवसेना भवनात पोहोचले आहेत. दसरा मेळाव्यादिवशी शिवतीर्थावर कोणत्या पदाधिकाऱ्याकडे कोणती जबाबदारी असणार, यासंबंधी आज चर्चा होईल तसेच जबाबदारीचं वाटपही होईल.

शिंदे गटात सामील होण्याची चर्चा, पण मिलिंद नार्वेकर रात्री अचानक शिवाजी पार्कमध्ये पोहोचले
गेल्या काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर शिवसेनेत तसेच ‘मातोश्री’वर सक्रिय नसल्याची चर्चा होती. त्यांची जागा बाळासाहेबांचे विश्वासू रवी म्हात्रे यांनी घेतल्याचंही बोललं गेलं. पण या साऱ्या चर्चांवर मिलिंद नार्वेकर यांनी पडदा पाडला आहे. रात्री शिवाजी पार्कला भेट देऊन आणि आता शिवसेना भवनातल्या बैठकीला उपस्थिती दर्शवून आपण ठाकरेंना सोडून कुठेही जात नसल्याचं थेटपणे त्यांनी सांगितलं आहे.

मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांचं नातं…!

मुळात मिलिंद नार्वेकर साधे शिवसैनिक होते. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातले गटप्रमुख. ९२च्या महापालिका निवडणुकांआधी त्यांच्या एरियातला वॉर्ड विभागला. म्हणून नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने नार्वेकर मातोश्रीवर पोहोचले. चुणचुणीत, हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा हा पंचविशीतला मुलगा उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरला. ते स्वत:च तेव्हा सुभाष देसाईंचं बोट पकडून सेनेत सक्रिय होत होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं, फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे? मिलिंद नार्वेकरांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, तुम्ही सांगाल ते…!

आधी मातोश्रीवर पडेल ते काम केलं आणि साधारण ९४ सालच्या उत्तरार्धात मिलिंद रितसर उद्धव ठाकरे यांचे पीए बनले. अपॉइण्टमेण्ट घेणं, डायरी ठेवणं, फोन घेणं, दौरे आखणं, व्यवस्था करणं अशी कामं ते करू लागले. पुढे स्मिता आणि राज ठाकरे मातोश्रीतील सत्ताकेंद्राच्या वर्तुळाबाहेर सरकली आणि उद्धव यांच्याकडे सेनेची अनभिषिक्त सत्ता आली. उद्धव मोठे होत होते आणि त्यांच्या बरोबरीने मिलिंदही मोठे होत होते. कधीच कोणत्याही गोष्टीला नाही न म्हणणारा, सांगितलेली गोष्ट काहीही करून पूर्ण करून देणारा, गोड बोलणारा, प्रसंगी स्वत:कडे वाईटपणा घेणारा, लोकांना कटवण्यात चतुर असणारा हा पीए उद्धव यांच्या गळ्यातला ताईत बनला. उद्धव बाळासाहेबांसारखे चोवीस तास लोकांत रमणारे नेते नव्हते. घरात, कुटुंबात आणि आपल्या छंदांत रमणारा हा साधा मध्यमवर्गीय डोक्याचा माणूस. त्यामुळे त्यांच्या अपॉइण्टमेण्ट कार्यकर्त्यांनाच काय पण पदाधिकारी आणि पत्रकारांनाही महाग होत्या. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचं महत्त्व वाढत चाललं ते आजतागायतही कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here