जिल्ह्यातील अतीवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी ५० हजार रुपये तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. शेतकऱ्यांची दीड लाखाची माफी झाली परंतु २ लाख रुपये ज्यांचे कर्ज आहे त्यांना देखील कर्जमाफी योजनेत सहभागी करणार अशी शासनाने घोषणा सरकारने केली होती. परंतू अजुनही उर्वरीत शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करा. अशा अनेक मागण्यांचे निवेदन आज प्रहारच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदन देताना प्रहार शेतकरी संघटनेचे मंगेश देशमुख म्हणाले की, वरील सर्व महत्वपूर्ण मागण्या तातडीने निकाली काढाव्यात आणि सध्या हताश झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा. अन्यथा प्रहार शेतकरी संघटना प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाच्या विरोधात आंदोलन करेल याची गंभीरतेने नोंद घ्यावी.
तब्बल अडीच वर्षानंतर प्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा दिला आहे. राजकीय परिस्थिती पाहता सध्या अमरावतीचे पालकमंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आहेत. मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले बच्चू कडू सध्या मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे. अशातच आज त्यांच्या प्रहार संघटनेने दिलेल्या निवेदनातून शिंदे आणि फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांबद्दल वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. येत्या काळात बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.