पुणे : राजकारणातली जुनी जाणती माणसं एकत्र आली की रंगते गतकाळातल्या आठवणींच्या गप्पांची मैफल… चाळली जातात भूतकाळातल्या बऱ्या वाईट प्रसंगांच्या पुस्तकरुपी आठवणींची पाने… आज ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकाच मंचावर होते. यावेळी त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या चार दशकांपूर्वीच्या राजकीय पदार्पणाच्या आठवणी जागवल्या. सुशीलकुमार शिंदे यांची राजकारणातली एन्ट्री आणि त्यांच्या पहिल्या निवडणुकीचा भन्नाट किस्सा आज शरद पवार यांनी सांगितला. निमित्त होतं महर्षी पुरस्कार प्रदान सोहळ्याचं…!

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना यंदाचा मानाचा ‘महर्षी पुरस्कार’ देण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास बापट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला आले होते. सुशीलकुमार शिंदे यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर मंचावरील दिग्गज नेत्यांनी चार दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.

सुशीलकुमार शिंदे यांच्या पहिल्या निवडणुकीचा भन्नाट किस्सा सांगताना पवार म्हणाले, “करमाळा हा त्याकाळी काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ होता. नामदेवराव जगताप म्हणून पक्षाशी प्रमाणिक असलेले नेते होते. त्यांचा हा मतदारसंघ होता. त्या मतदारसंघात मोठ्या कष्टाने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळाली. त्यांचा अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढायचे ठरले. त्या मिरवणुकीत शिंदेंच्या एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला नामदेवराव होते. रस्त्याला हजारो लोक होते. अशी गर्दी शिंदेंनी आयुष्यात पाहिली नव्हती. शिंदे यांना नामदेवराव सारखे सांगायचे मतदाराला हात जोडले पाहिजे. मात्र शिंदेंना हात जोडायचे लक्षात यायचे नाही. तेव्हा ते विसरले की नामदेवराव त्यांना धक्का द्यायचे. अशा पद्धतीने त्यांच्या पहिल्या निवडणुकीची प्रचारफेरी झाली. त्यानंतर ते मोठ्या मताने निवडून आले”.

मित्र संकटात असताना नार्वेकर ‘दुसरीकडे’ जातीलच कसे? आज महत्त्वाच्या प्लॅनिंगसाठी सेना भवनात!
शिंदेंना नोकरी सोडायला लावली पण…

सुशीलकुमार शिंदे पोलीस खात्यात नोकरीला होते. आमची आणि त्यांची खूप खास मैत्री होती. राजकारण-समाजकारणाची त्यांनी आवड होती. समाजाविषयी तळमळीने काम करण्याची त्यांची जिद्द मला कायम दिसायची. त्याच उद्देशातून त्यांना मी नोकरी सोडायला लावली अन् आमदारकीचं तिकीट देतो असं सांगितलं. माझ्या सांगण्यावरुन त्यांनीही नोकरी सोडली. पण खूप प्रयत्न करुनही काँग्रेस पक्षाच्या त्यावेळच्या वरिष्ठांनी सुशीलकुमार शिंदेंना तिकीट दिलं नाही. त्यानंतर मला जेव्हा मुंबई विमानतळावर सुशीलकुमार शिंदे भेटले, त्यावेळी माझे डोळे पाण्याने डबडबले होते. मी आपल्या मित्राला दिलेला शब्द पाळू शकलो नाही, अशी भावना माझ्या मनात होती. मात्र त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनीच माझी समजूत काढली, अशी आठवण आज शरद पवार यांनी सांगितली.

अन् सुशीलकुमार शिंदेंना बघितल्यावर शरद पवारांचे डोळे पाण्याने डबडबले!
पण नंतर करमाळा पोटनिवडणुकीत शिंदेंना उमेदवारी मिळाली, ते तिथे जिंकले. त्यांनी परत मागे वळून पाहिलं नाही, राज्यमंत्री, त्यानंतर मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, गव्हर्नर झाले, केंद्रीय मंत्री झाले. अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्या. नवीन विषयाचा अभ्यास करून त्याची मांडणी सदनात कशी करता येईल याचा आदर्श शिंदे यांनी त्याकाळी केला. मला आनंद आहे आज याठिकाणी त्यांचा सन्मान केला आणि त्यांना पुरस्कार दिला, अशा भावना पवारांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here