गीता भोसले यांनी पतीला मदत करत चक्क यशाचं शिखर गाठलं

एखाद्या स्त्रीने जर मनात दृढनिश्चय केला की मला एखादं शिखर गाठायचं आहे तर ती सर्वस्व त्या गोष्टीला अर्पण करते आणि त्या दिशेने वाटचाल करते. जोपर्यंत ते यश मिळत नाहीत तोपर्यंत तिचा संघर्ष हा स्वतःशी आणि आपल्या कामाशी राहतो. असाच एक प्रसंग बीडमध्ये झाला आहे तो म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असलेलं छोटसं गाव म्हणजे आपेगाव या ठिकाणी असलेल्या गीता भोसले यांनी पतीला मदत करत चक्क यशाचं शिखर गाठलं आहे.
गीता भोसले जवळपास यांचा विवाह वयाच्या १८व्या वर्षी झाला

गीता भोसले जवळपास यांचा विवाह वयाच्या १८व्या वर्षी झाला. मात्र, अवघं नववीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर विवाह झाल्याने पुढचं सगळं स्वप्न हे भंग झाल्यासारखे झालं. आपला पतीच परमेश्वर असं मानत त्यांनी या विवाहमध्ये आपलं आयुष्य झोकून दिलं. विवाहानंतर काही वर्षात दोन मुलं ही झाली मात्र पतीचा व्यवसाय हा फोटोग्राफी या फोटोग्राफीसाठी पतीने बऱ्याच वेळेस आग्रह धरला की तू देखील या फोटोग्राफीत माझ्यासोबत काम करु शकते. पण माझं शिक्षण नाहीये आणि मी कसा कॅमेरा धरु आणि जवळपास कुठेच महिलांनी कॅमेरा हातात घेतलेला दिसला नाही. या घालमेलमध्ये शेवटी २०१४ मध्ये त्यांनी त्यांच्या पतीला मदत म्हणून हा कॅमेरा हातात घेतला. त्याचसोबत त्यांचं पहिलं पाऊल पडलं ते फोटोग्राफी विश्वात. परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी ही फोटोग्राफी २०१६ मध्येच सुरु केली असल्याचं सांगितलं आहे.
फोटोग्राफी क्षेत्रात बाई माणूस कसं काम करु शकेल

फोटोग्राफी क्षेत्रात बाई माणूस कसं काम करु शकेल असे एक ना अनेक प्रश्न समाजातील लोकांनी उभे केले आणि त्यामध्ये त्यांचा भाऊ त्यांची सासू सासरे यांना लोकांनी नाव ठेवण्यास सुरुवात केली. मात्र, यामध्ये थोड्याफार प्रमाणात नाराज होऊन आता पुढे काय होईल याचा विचार गीता यांना पडला. मात्र, याचा विचार न करता घरी कुटुंबात सासू-सासरे, पती, भाऊ यांनी मला धीर दिला. लोकं काहीही बोलतात पण तुला जे आवडतं, जे तुला करावं वाटेल ते तू कर, त्यांनी असं म्हटल्यानंतर मी अजून जोमाने कामाला लागली.
तिच्यामुळेच आज माझही नाव सर्वत्र पसरलं आहे

फोटोग्राफीमध्ये पाहिजे तसा काळ राहिला नव्हता आणि त्याच फोटोग्राफीमध्ये २१व्या शतकात वेगळं काही करण्यासाठी गीताने पुण्यात एका खाजगी प्रशिक्षण क्षेत्रात बॉर्न फोटोग्राफी, किड्स फोटोग्राफी याचं काही दिवसांचे प्रशिक्षण घेतलं. या प्रशिक्षणात खूप अडचणी आल्या. परंतू, या अडचणींवर मात करत त्यांनी स्वतःच या फोटोग्राफीत आणि बॉर्न फोटोग्राफीसाठी पूर्ण लक्ष लावलं. त्यानंतर त्यामध्ये त्यांची चर्चा ही अंबाजोगाई तालुकाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर होऊ लागली आणि याच ओळखीने त्यांच्या पतीला देखील एक वेगळी ओळख दिली असं त्यांचे पती सांगतात. माझ्या पत्नीला फक्त एक मदत म्हणून मी सहकार्य करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र, त्याला सुद्धा तिचा नकार होता पण हळूहळू तिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि तिच्यामुळेच आज माझही नाव सर्वत्र पसरलं आहे.
गीता भोसले यांना बीड जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे पुरस्कार मिळाले

गीता भोसले यांना बीड जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे पुरस्कार मिळाले आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यु-ट्युब या तिन्ही माध्यमांनी गीता भोसले यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केलं. गीता भोसले यांना फोटोग्राफीसाठी कॉल येतात तर काही लोकं बीडला येऊन त्यांच्या अंबाजोगाई या ठिकाणी असलेल्या स्टुडिओला भेट देऊन फोटो काढतात. बीड जिल्ह्यात गीता भोसले यांचं कौतुक अनेक राजकीय पटलावर देखील केले जात असल्याचं पाहायला मिळतं.