पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस ही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का,’ या प्रश्नावर पवार बोलत होते. गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली. ती येत्या शुक्रवारी राज्यात देगलूर (जि. नांदेड) येथे पोहोचणार आहे.
राज्यात दसऱ्या मेळाव्यावरून सुरू असलेल्या संघर्षावरही पवार यांनी टिप्पणी केली. ‘राज्यात दसरा मेळाव्यावरून सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे. संघर्ष होत असतात; मात्र त्यामध्येही मर्यादा राखली गेली पाहिजे. या मर्यादा ओलांडून काही होत असेल, तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही. राज्यातील जबाबदार नेत्यांनी याबाबत पावले टाकली पाहिजे. राज्यातील ज्येष्ठांवर जशी जबाबदारी आहे, तशी राज्याच्या प्रमुखांवरही आहे. ते पक्षाचे प्रमुख असले, तरी राज्यातील १४ कोटी जनतेचेही प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी अधिक आहे,’ असे पवार यांनी नमूद केले.
‘या मेळाव्यांतून कटुता वाढणार नाही, अशी मांडणी दोन्ही गटांकडून होईल, अशी अपेक्षा आहे,’ अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. दसरा मेळावा शिवसेनेचा कार्यक्रम असून, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारास राष्ट्रवादी काँग्रेस सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.