Andheri byelection Shivsena vs BJP | शिवसेना-भाजप युती २०१९ मध्ये असताना ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. लटके यांनी त्यांचा १६९६५ मतांनी पराभव केला, तरी ४५८०८ मते मिळवून ते दुसऱ्या स्थानी राहिले होते. ही जागा शिवसेनेकडे असल्याने शिंदे गटाने त्यावर दावा केला होता.

 

Eknath Shinde Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • शिवसेना पक्षाचा अधिकृत AB Form देण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांनाच
  • शिंदे गटाकडे कोणतेही पक्षचिन्ह नाही
मुंबई: शिवसेना पक्षातील ऐतिहासिक बंडानंतर सर्वांना उत्सुकता असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. शिवसेना नगरसेवक रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघावर साहजिकच शिवसैनिकाचा दावा होता. अशा परिस्थितीत शिंदे गट (Eknath Shinde camp) या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, शिंदे गटाने ही जागा सहजासहजी भाजपच्या मुरजी पटेल (Murji Patel) यांना सोडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी ही जागा भाजपच (BJP) लढवेल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु, इतक्या मोठ्या बंडानंतर शिंदे गटाने मुंबईत शिवसेनेशी थेट दोन हात करण्याची संधी का सोडली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचे खरे कारण आता समोर आला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? उज्वल निकम यांची महत्त्वाची माहिती
सध्या शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर हक्क सांगितला जात असला तरी अधिकृतरित्या त्यांना पक्षाचा ताबा मिळालेला नाही. आजही शिवसेना पक्षाचा अधिकृत AB Form देण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडेच अबाधित आहे. तसेच शिंदे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची म्हटली तरी त्यांच्याकडे कोणतेही पक्षचिन्ह नाही. त्यामुळे ‘आम्हीच खरी शिवसेना’ असे ठासून सांगणाऱ्या शिंदे गटाला भाजपच्या मुरजी पटेल यांना पाठिंबा देण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १४ ऑक्टोबरपर्यंत आहे. तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईसारख्या रणमैदानात शिवसेनेशी दोन हात करण्याची संधी समोर दिसत असूनही हात चोळत बसण्याशिवाय शिंदे गटाकडे कोणताही पर्याय उरलेला नाही.
काँग्रेस सोडून माजी आमदार शिंदे गटात आणि ठाकरेंचा शिंदेंविरोधात भन्नाट प्लॅन; मटा ऑनलाईनच्या टॉप १० बातम्या
शिवसेना-भाजप युती २०१९ मध्ये असताना ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. लटके यांनी त्यांचा १६९६५ मतांनी पराभव केला, तरी ४५८०८ मते मिळवून ते दुसऱ्या स्थानी राहिले होते. परंतु, आता रमेश लटके नसल्याने शिवसेनेकडे या मतदारसंघात त्यांच्याइतका दुसरा प्रभावी चेहरा नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच उभा राहिला होता. परंतु, रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर करुन हा प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे आता भाजपचे मुरजी पटेल १६ हजार मतांची पिछाडी भरून काढणार का, हे पाहावे लागेल. शिवसेना फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराचा पराभव केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होईल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here