दीपक माझ्या विवाहित मुलीला त्रास देत होता. अनेकदा त्याला मुलीपासून दूर राहण्यास सांगितलं. मात्र त्यानं ऐकलं नाही. त्यामुळे त्याच्या हत्येची योजना आखल्याचं आरोपी फहमीद बटनं पोलिसांना सांगितलं. दीपकला मी माझ्या विवाहित मुलीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं होतं. तिला भेटू नको असं मी त्याला अनेकदा बजावलं. पण तरीही तो तिला भेटायचा. त्यामुळे आसिफच्या मदतीनं मी त्याला संपवलं, अशी माहिती बटनं पोलिसांना दिली.
दीपक रात्री दारू प्यायला होता. आमची आणि त्याची ओळख असल्यानं आम्ही त्याला ट्यूबवेलकडे घेऊन गेलो. तो नशेत होता. याच परिस्थितीचा फायदा घेऊन आम्ही त्याची मान कापली, असं बटनं पोलिसांना सांगितलं. दीपकच्या मृतदेहाची ओळख पटू नये असा आरोपींचा प्रयत्न होता. त्यामुळे त्याचं शिर धडावेगळं करण्यात आलं. पोलिसांनी आरोपींनी दिलेल्या माहितीवरून एका ठिकाणी खोदकाम केलं. तिथे दीपकचं शिर सापडलं. हत्येसाठी वापरण्यात आलेली तलवारदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली.
परीक्षितगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतात २७ सप्टेंबरला एक मृतदेह सापडला होता. या मृतदेहाचं शिर गायब होतं. पोलिसांनी तपास करत मृतदेहाची ओळख पटवली. दीपकच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.