मागील सरकारनं आणलेल्या अनेक योजनांना ब्रेक दिला जात असताना शिंदे सरकार अशोक चव्हाणांवर इतकं मेहरबान का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण नाराज असल्याची चर्चा आहे. पक्ष नेतृत्त्वावर नाराज असलेले चव्हाण काँग्रेसचा हात सोडू शकतात अशी चर्चा आहे. तशी सूचक विधानं भाजपच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत केली आहेत.
काँग्रेस उमेदवाराचा पराभव अन् फुटलेली मतं
जून महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची मतं फुटली. विशेष म्हणजे हंडोरेंचा विजय निश्चित मानला जात होता. काँग्रेस आमदारांची पहिल्या पसंतीची मतं त्यांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र नेमकं उलट घडलं. हंडोरेंना अपेक्षित मतं मिळाली नाहीत. काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप मात्र विजयी झाले. त्यावेळी काँग्रेसच्या फुटलेल्या मतांची बरीच चर्चा झाली होती.
विश्वासदर्शक ठरावाला अनुपस्थित
जून महिन्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत तत्कालीन मविआ सरकारला धक्के बसले. दोन्ही निवडणुकीत भाजपनं अपुरी मतं असतानाही जास्तीचे उमेदवार दिले आणि ते निवडूनही आले. या दोन धक्क्यांनंतर मविआ सरकार कोसळलं. शिंदेंनी भाजपच्या साथीनं सत्ता स्थापन केली. सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावावर मतदान होत असताना काँग्रेसचे १० आमदार विधिमंडळात अनुपस्थित होते. त्यांना पोहोचायला उशीर झाला. या आमदारांमध्ये अशोक चव्हाणांचा समावेश होता.