श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे ते अशोकनगर या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याची गेल्या २६ वर्षांत अत्यंत दुरावस्था झालेली आहे. साडेपाच हजार लोकसंख्या असलेल्या मालुंजे गावातील ग्रामस्थांना रहदारीसाठी हाच मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज साधारण तीन हजार लोक ये-जा करत असतात. मात्र, ऐन पावसाळ्यात रस्त्यावरून चालणे देखील अवघड होते आणि त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
विशेष म्हणजे हे गाव शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी दत्तक घेतले होते. मात्र, या रस्त्याच्या कामासाठी खासदार, आमदारांसह प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही कुणीही प्रतिसाद न दिल्याने अखेर हतबल झालेल्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हा रस्ता रहदारी योग्य बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून २ ते ३ हजार रुपये निधी संकलीत करण्यात येत असून त्यामाध्यमातून रस्त्याच्या मुरुमिकरणाचे काम सुरू करण्यात आलं आहे.
तुम्ही तिकडे कितीही खोके घ्या मात्र आमच्या रस्त्यासाठी आता आम्हीच आमचे दोन-दोन हजारांचे खोके तयार करून रस्त्याचे काम करतो अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या. वारंवार पाठपुरावा करुनही प्रशासन दखल घेत नाही. लोकप्रतिनिधी सुद्धा हात वर करत असल्याने हतबल झालेल्या ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.