या सर्व शिवसैनिकांसाठी प्रताप सरनाईक यांनी तब्बल दोन ते अडीच लाख फुड पॅकेटसची ऑर्डर दिली आहे. ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानाला ही ऑर्डर देण्यात आली आहे. या फूड पॅकेट्समध्ये धपाटे, ठेपला, कचोरी, गुलाबजाम असे चविष्ट पदार्थ असणार आहेत. प्रत्येक शिवसैनिकाला बीकेसी मैदानावर मेळावा संपल्यानंतर हे फूड पॅकेट्स दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रशांत कॉर्नरच्या कारखान्यात सध्या फूड पॅकेटस तयार करण्याची लगबग सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातून येणाऱ्या शिवसैनिकांची व्यवस्थित काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे कार्यकर्ते येतील त्यांची जेवणाची, पाण्याची आणि वॅाशरुमची सर्व व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मोठी गर्दी होणार?
बांद्रा कुर्ला संकुलात सभा होत असल्याने लाख-दीड लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे. ही गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी गेली १५ दिवस जिल्हा-तालुका पिंजून काढला आहे. प्रत्येक शिवसैनिकाची मुंबईत येण्यापासून राहण्या-खाण्यापर्यंतची व्यवस्था होईल, अशी तयारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शिंदे गटाने सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण केलं होतं. तसेच ३ हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख, नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत. कसारा, कर्जत, खोपोली, पालघर, विरार, डहाणू रोड येथून येणाऱ्या मिनी बस, टेम्पो ट्रॅव्हलर, सात आसनी कार अशा वाहनांची संख्यादेखील हजारोंच्या संख्येत असेल.