मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते. तीन हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण पूर्ण झाले आहे. बांद्रा कुर्ला संकुलात सभा होत असल्याने लाख-दीड लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे. ही गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी गेली १५ दिवस जिल्हा-तालुका पिंजून काढला आहे. प्रत्येक शिवसैनिकाची मुंबईत येण्यापासून राहण्या-खाण्यापर्यंतची व्यवस्था होईल, अशी तयारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
लालपरीचं बुकिंग करण्यासाठी शिंदे गटाने तब्बल १० कोटी रुपये खर्च केले आहेत. ही रक्कम मोजण्यासाठी सुमारे दोन दिवस लागल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली. याअगोदर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गाड्यांचं आरक्षण व्हायचं. मात्र इतिहासात पहिल्यांदाच महामंडळाच्या गाड्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात आरक्षण झालंय, अशी प्रतिक्रिया एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ठाकरेंच्या मेळाव्याचं नियोजन कसं आहे?
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख, नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत. कसारा, कर्जत, खोपोली, पालघर, विरार, डहाणू रोड येथून येणाऱ्या मिनी बस, टेम्पो ट्रॅव्हलर, सात आसनी कार अशा वाहनांची संख्यादेखील हजारोंच्या संख्येत असेल. दोन्ही सभांसाठी एकूण जवळपास दहा हजार वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे, असे राज्यातील खासगी बसचालक-मालकांकडून सांगण्यात आले.
काँग्रेसचे अतुल लोंढे म्हणतात, ईडी-आयटीने चौकशी करावी!
दसरा मेळाव्यासाठी ST बसेस बुक करण्यासाठी शिंदे गटाने १० कोटी रुपये रोख दिल्याचे बातम्यांमधून समजते आहे. ही रक्कम शिवसेना पक्षाच्या खात्यातून दिली आहे का? नसेल तर ही रक्कम कुठून आणली ? १० कोटींचा रोख व्यवहार कसा केला ? ED आणि IT ने याची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलीये.
कोणत्या गाडीला किती पैसे, दोन्ही गटांचं नियोजन वाचा….
एसटीचे २४ तासांसाठी किमान भाडे १२ हजार रुपये आहे. २४ तासांनंतर ५६ रुपये प्रति किमी या दराने महामंडळ आकारणी करते. ३०० किमी अंतराला सात आसनी इनोव्हा गाडीसाठी साधारण ५,१०० ते ५,७०० रुपये, १३ आसनी ट्रॅव्हलरसाठी सहा हजार ते साडेसहा हजार रुपये भाडे आकारण्यात येते. मिनी बससाठी ७,२०० ते ७,८०० असे दर आहेत, असे वाहन व्यावसायिक (टूर्स-ट्रॅव्हल्स) प्रशांत थोरात यांनी सांगितले. दोन हजार बस उभ्या राहतील, अशी व्यवस्था कलिना परिसरात करण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदानांत प्रत्येकी एक हजार आणि सोमय्या मैदानात ७०० ते ९०० वाहने उभी करण्याचे नियोजन आहे. दसऱ्याची सुट्टी असल्याने त्या दिवशी मुंबईतील नोकरदारांच्या नियमित वाहनांची संख्या कमी असेल. त्यामुळे तात्पुरत्या वाहनतळांची क्षमता पूर्ण झाल्यावर पूर्व-पश्चिम महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या कडेला, अन्य वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने वाहने उभी करण्याच्या सूचना संबंधित चालकांना देण्यात आल्या आहेत, असे सभांसाठी आरक्षित झालेल्या बसच्या चालकांनी सांगितले.