पंतप्रधानांच्या कानावर घालणार- सुप्रिया सुळे
शिंदे गटाने बसेससाठी दहा कोटीची कॅश भरली आहे, असं माझ्या वाचनात आत्ताच आलं. ज्यांनी देशात नोटबंदीचा निर्णय लागू केला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास ही बाब मी आणून देणार आहे. एवढी कॅश आली कठून हा प्रश्न आहे. कारण याच मुद्द्यावर आम्ही संसदेत फारच गंभीरपणे चर्चा केलेली आहे. इतक्या नोटा सर्क्युलेशनमध्ये कशा आल्या. जर या देशात नोटबंदी झाली आहे, तर मग इतक्या नोटा सर्क्युलेशनमध्ये येणे अशक्य आहे. म्हणूनच मला वाटतं की याची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. एवढ्या १० कोटी रुपयांच्या नोटा आल्या कुठून हा प्रश्न आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
ज्या देशात नोटबंदी झाली, त्याच देशात जर १० कोटी रुपयांची कॅश एक गट भरत असेल आणि वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार दोन दिवस तर या नोटा मोजण्यासाठी लागलेले आहेत. तर मग या नोटा आल्या कुठून. त्यामुळे मला चिंता वाटते… हा खूपच गंभीर विषय आहे. आपण सगळ्यांनीच हा विषय फार गांभिर्याने घेतला पाहिजे. कारण आम्ही नोटा कमी करत आहोत आणि सर्व ट्रान्झॅक्शन ऑनलाइन आणि बँकेमार्फत करत आहोत. त्यामुळे कोणाच्याच हातात नोटा नसतात. मग या नोटा आल्या कुठून? हा विषय चिंताजनक आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे.
या नोटा खोक्यातून आल्या आहेत का?
या एवढ्या नोटा खोक्यातून आल्यात का, असा प्रश्न पत्रकारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, याबद्दल मला माहिती नाही. याची चौकशी व्हायला पाहिजे, असे खासदार सुळे म्हणाल्या.
देशमुखांना जामीन हा सत्याचा विषय
अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्यमेव जयते… शेवटी सत्याचा विजय झाला.. मला मनापासून आनंद झाला. बाकीच्यांनाही लवकर मिळेल अशी आमचा प्रयत्न राहील. संजय राऊत, नवाब मलिक आणि एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनाही लवकरात लवकर जामीन मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे खासदार सुळे म्हणाल्या.