यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खानिकर्म मंत्री दादाजी भुसे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसंच विविध विभागाचे महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पात्र उमेदवारांपैकी आज २७ पुरूष उमेदवारांना नेमणुकीचे पत्र देण्यात आलं असून उर्वरीत उमेदवारांना लवकरच नेमणूक देण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थपकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
महिलाही करणार एसटीचे सारथ्य
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने राबवलेल्या भरती प्रक्रियेत चालक तथा वाहक पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागवले होते. यामध्ये २०३ महिला उमेदवार लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असून १४२ महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सादर केला आहे. यापैकी २२ महिला उमेदवारांना आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सेवापूर्व प्रक्षिणाचे पत्र देण्यात आले. ८० दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एसटीचे सारथ्य करण्यास सज्ज होणार आहेत.