मुंबई पोलिसांनी अरविंद भोसले यांना पत्र लिहून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अशी परवानगी देता येणार नाही, असं पत्रात सांगितलं आहे. यावर अरविंद भोसले यांनी सांगितलं की, आम्ही गेली १० वर्षे पायी चालत होतो. दरवर्षी आम्ही ४ वाजता मातोश्रीहून चालत निघतो आणि साडेपाच वाजेपर्यंत शिवाजी पार्कमध्ये पोहचत असत.
मेळाव्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार तयारी
दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेची सभा शिवाजी पार्कात होणार आहे. तर शिंदे गटाची सभा बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात पार पडणार आहे. या सभांमध्ये शक्तिप्रदर्शनासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यादिवशी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. वांद्रे कुर्ला संकुलात होणाऱ्या सभेत राज्यभरातून तीन हजार बसमधून कार्यकर्ते सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या बसच्या पार्किंगसाठी विद्यापीठातील जागा उपलब्ध व्हावी, अशी विनंती करणारे पत्र मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभागाच्या सहाय्यक अभियंतांनी पाठविले होते. या पत्राच्या अनुषंगाने विद्यापीठाने कालिना संकुलातील शारीरिक शिक्षण भवन जवळील मैदान, एआयटीए येथील मोकळी जागा आणि विद्यानगरी उत्तरद्वाराजवळील मोकळी जागा उपलब्ध करून दिली आहे. ही जागा उपलब्ध करून देत असताना विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होणार नाही, विद्यापीठाच्या मैदानांचे कोणतेही नुकसान होणार नाही अशा विविध अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.