म. टा. वृत्तसेवा, येवला : माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून सातत्याने छळ होत असल्याने दीड महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहितेने त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना येवला तालुक्यातील अंगणगाव येथे घडली आहे. याप्रकरणी तिच्या पतीसह, सासरा, दीर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पूजा संदीप आठशेरे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील बाबासाहेब भारसकळ (रा.नायगाव,ता. श्रीरामपूर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पूजाचा विवाह दीड महिन्यापूर्वी झाला होता. शेतात पाइपलाइन करण्यासाठी व रोटर घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणले नाही म्हणून या सर्वांकडून पूजाचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळेच या त्रासाला कंटाळून तिने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी मनमाड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे तसेच पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी सासू वगळता इतर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times