गोरेगाव येथील येस बँकेच्या एका खातेदाराच्या खात्यामध्ये चक्क खेळण्यातील नोटा भरण्यात आल्याचे समोर आले आहे. गोरेगाव येथील शाखेच्या बाहेर रोख रक्कम भरण्यासाठी मशीन लावण्यात आली आहे.

 

rupee-1
म. टा. खास प्रतिनिधी मुंबईः गोरेगाव येथील येस बँकेच्या एका खातेदाराच्या खात्यामध्ये चक्क खेळण्यातील नोटा भरण्यात आल्याचे समोर आले आहे. गोरेगाव येथील शाखेच्या बाहेर रोख रक्कम भरण्यासाठी मशीन लावण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे दररोजची रोख रक्कम जमा करत असताना बँक कर्मचाऱ्यांना १०० रूपयांच्या ६६ या नोटा सापडल्या. विशेष म्हणजे या मशीनने या नोटा स्वीकारल्याच कशा, तसेच ही रक्कम भरणाऱ्याचा नेमका उद्देश काय, याचा तपास दिंडोशी पोलिस करीत आहेत.

येस बँकेच्या गोरेगाव शाखेच्या बाहेर कॅश डिपॉझिट मशीन बसविण्यात आली आहे. या मशीनमुळे बँक खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी बँकेत जाण्याची गरज भासत नाही. या मशीनमधून पैसे काढताही येतात. या मशीनमध्ये रक्कम जमा करण्याचे तसेच जमा केलेली रक्कम काढून नेण्याचे कंत्राट चेंबूर करन्सी चेस्ट या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी ३ सप्टेंबर रोजी रोख रक्कम भरण्यासाठी आले. त्यांनी मशीन उघडली असता त्यामध्ये शंभर रुपयांच्या सुमारे ६६ नोटा हाती लागल्या. कर्मचाऱ्यांनी या नोटांची बारकाईने तपासणी केली असता त्या खोट्या असल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्हीत एक तरुण ही रक्कम भरताना दिसत आहे. या नोटांवर ‘भारतीय बच्चो का खाता’ असे हिंदी आणि इंग्रजीत लिहिण्यात आले आहे. नोटांवरही महात्मा गांधीजींच्या फोटोखाली ‘फक्त चित्रीकरणासाठी’ असे इंग्रजीत लिहिण्यात आले आहे. नोटांच्या दोन्ही बाजूला कॅश हब चेंबूर असा शिक्का मारलेला आहे. बँक कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता १ सप्टेंबर रोजी या खेळण्यातील नोटा जमा करण्यात आल्या आहे.

खेळण्यातील नोटा जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खातेदार आणि पैसे भरणारा एकमेकांच्या परिचयातील आहेत का? याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकारामुळे मशीनच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मशीनने खेळण्यातील नोटा स्वीकारल्या कशा याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. ज्या खातेदाराच्या खात्यामध्ये पैसे पाठविण्यात आले त्याचा आणि फुटेजमधील व्यक्तीचा हे एकमेकांच्या परिचयातील आहेत का हे देखील तपासले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here