मुंबई: शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शिंदे गटाकडून आपल्या पहिल्यावहिल्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या बीकेसी मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी अनेक बसेस आणि खासगी वाहनांनी आपापल्या भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना मुंबईत आणले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटाकडून करण्यात आलेले बसेसचे बुकिंग, फूड पॅकेटसची ऑर्डर आणि अन्य खर्चाची प्रचंड चर्चा रंगली आहे. यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे, तलवार.

मुंबईच्या बीकेसी मैदानावर बुधवारी संध्याकाळी शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. याठिकाणी ही ५१ फुटी तलवार ठेवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर येतील तेव्हा त्यांच्या हस्ते शस्त्रपूजन होईल. तेव्हा या तलवारीचे पूजन केले जाईल, असे सांगितले जात आहे. याशिवाय, उद्योगमंत्री उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यावेळी १२ फुटांची चांदीची तलवार भेट देणार असल्याचेही समजते. या दोन तलवारींची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
राजकीय महामुकाबला! ठाकरे-शिंदे यांच्यातील संघर्षाचा आजच्या मेळाव्यात नवा अंक
तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बीकेसी मैदानावर जाऊन दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेही सोबत होते. आज सकाळपासून शिंदे गटाचे मुंबईबाहेरील आमदार आणि कार्यकर्ते बीकेसी मैदानावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईतील वेगवेगळ्या भागांतून तसेच मुंबईबाहेरून लाखो कार्यकर्ते आज, बुधवारी दसऱ्यानिमित्त मुंबईत दाखल होणार आहेत. सुमारे चार हजार बसेस आणि दहा हजार लहान मोठी खासगी वाहने येण्याची शक्यता असल्याने वाहतूककोंडी होऊ नये यासाठी दोन्ही ठिकाणच्या परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.
Dasara Melava: दसरा मेळाव्यामुळे व्यावसायिकांची चांदी; पिण्याचे पाणी, चहा आणि खाद्यपदार्थांचा खप वाढणार

१८०० लालपरी बूक, ३ हजार खासगी गाड्याही आरक्षित

दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने मुंबईत आणण्यासाठी शिंदे गटाने १८०० एसटी बसेसचं बुकिंग केल्याचं समोर आलं आहे. यासाठी तब्बल १० कोटी रुपये रोख भरले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते. तीन हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण पूर्ण झाले आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख, नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत. कसारा, कर्जत, खोपोली, पालघर, विरार, डहाणू रोड येथून येणाऱ्या मिनी बस, टेम्पो ट्रॅव्हलर, सात आसनी कार अशा वाहनांची संख्यादेखील हजारोंच्या संख्येत असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here